इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जुळे मुले असणे हा खरोखर योगायोग मानला जातो, कारण जुळी असली तरी काही वेळा मुले अगदी दिसत सारखीच असतील असे काही घडत नाही परंतु बहुतांश जण जुळे बहिण भाऊ किंवा भाऊ भाऊ बहिणी बहिणी हे एकमेकांसारखे दिसतात आणि कालांतराने येथेच गडबड होते. जगभरात दरवर्षी तब्बल १६ लाख जुळी बाळं जन्मतात. जगात जन्मणाऱ्या प्रत्येक ४२ बाळांमागे एक जुळं असतं. उशिराने गर्भधारणा आणि गर्भधारणेसाठी आयव्हीएफसारख्या वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वाढता वापर, यामुळे १९८० सालापासून जुळी अपत्यं जन्माला येण्याचं प्रमाण वाढलं आहे.
या संदर्भात आपण हिंदी चित्रपटात अनेक वेळा असे प्रकार बघतो. जुळ्या भावांवरचे, जुळ्या बहिणींवरचे किंवा डबल रोल असलेले असंख्य चित्रपट तुम्ही आजवर पाहिले असतील. त्यातील गमती-जमतींनी त्यांच्या हरखूनही गेला असाल. अगदी नुसती यादी आठवली बॉलिवूडचे अनेक चित्रपट तुमच्या डोळ्यांसमोरून तरळत जातील.
अगदी अभिनेता दिलीप कुमारच्या ‘राम और श्याम’पासून सुरू झालेला हा सिलसिला नंतर असा कितीही वाढवता येईल. डबल रोलची ही क्रेझ अजूनही संपलेली नाही आणि नियमित कालावधीनंतर असे चित्रपट सातत्यानं येतही असतात, पण प्रत्यक्ष आयुष्यातही असे डबल रोल आपल्याला दिसले तर? त्यावेळीही आपल्याला आश्चर्यच वाटतं. कारण हे डबल रोल इतके हुबेहूब असतात की यातला कोण, नेमका कोणता हे सांगणं आपल्याला फारच अवघड जातं.
खरे म्हणजे जुळी मुले आपल्यालाच काय, त्यांच्या सख्ख्या आई-वडिलांना, नवऱ्याला किंवा बायकोलाही त्यांना ओळखणं अवघड जातं. परंतु त्याहून आगळावेगळा असा एक किस्सा घडला आहे, अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतात प्रत्यक्षात घडलेली ही घटना आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीचा डीएनए वेगळा असतो असे विज्ञान सांगते. एकाच आई-बापाची, जुळी भावंडे यांचाही डीएनए थोडाफार मिळता जुळता असला तरी तो सारखाच असेल असे नसते. अमेरिकेत मात्र वैज्ञानिकाना बुचकळ्यात टाकणारी एक घटना घडली आहे. दोन मुले, ज्यांचे आईवडील वेगळे आहेत, ही मुले सख्खी भावंडे नाहीत आणि तरीही त्यांचे डीएनए एकसारखे आहेत. वैज्ञानिकांनी त्यांना जेनेटिक किंवा अनुवांशिक भावंडे असे म्हटले आहे.
व्हर्जिनिया येथील ब्रीयाना आणि ब्रिटनी या ३५ वर्षाच्या जुळ्या बहिणी. त्यांनी ३७ वर्षाचे जॉश आणि जेरेमी या जुळ्या भावांशी लग्न केले. त्या दोघीनाही लग्नानंतर मुलगे झाले आणि या दोन मुलांच्या जन्मात तीन महिन्याचे अंतर आहे. या दोन्ही मुलांचे डीएनए एकसारखे आहेत. ही मुले आता साधारण वर्षाची आहेत. आई जुळ्या, वडील जुळे असले तर विज्ञान भाषेत याला क्वाटर्नरी ट्वीन्स म्हणतात. जगभरातअसे फक्त ३०० परिवार आहेत. आई वडील जुळे असतील तर जीन्स बरेच समान असू शकतात.
खरे तर या दोन्ही बहिणी आणि दोघे भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे. त्यांचा एकमेकांशी कधी संपर्कही आला नाही; पण एका टीव्ही शोच्या निमित्तानं या चौघांचा एकमेकांशी परिचय झाला. अमेरिकी टीव्ही चॅनल ‘टीएलसी’च्या ‘एक्स्ट्रीम सिस्टर्स’ या शोमध्ये एकत्रितपणे ते दर्शकांच्या समोरही आले. याच कार्यक्रमादरम्यान त्यांचं एकमेकांशी प्रेम जमलं. दोन्ही जोडप्यांनी आपापले पार्टनर निवडले आणि याच शोमध्ये या जुळ्यांचं ‘टि्वन वेडिंग’ही झालं! पण या दोन्ही दाम्पत्यांना जे एक-एक मूल झालं, त्यांचे आईबाप वेगळे असूनही तीही ‘जुळी’ आहेत! दिसायलाही सारखी आहेत. तांत्रिकदृष्ट्या ते ‘कझिन्स’ असले, तरी अशा मुलांना सख्खे भाऊ किंवा बहीण मानलं जातं. जगात अशा जुळ्या भावंडांचं प्रमाण अतिशय दुर्मीळ आहे, असे सांगण्यात येते.
Twins Family Mother Father Sister Brother Twins