मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छोटा पडदा अर्थात टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सध्या विशेष चर्चेत आहे. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहे. सहाजिकच या मालिकेतील कलाकारांविषयी प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. एखाद्या नव्या कलाकाराची एन्टी झाली किंवा एखादा कलाकार बाहेर पडला तर त्याची लगेच चर्चा सुरू होते, सध्या देखील तसेच घडत आहे.
आजकाल हा शो सतत चर्चेत असतो कारण प्रथम शैलेश लोढा (मालिकेतील तारक मेहता) यांनी शो सोडला. त्यानंतर दया बेनचे पात्र परतणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. निर्माता असित मोदींनी सांगितले की, दिशा वाकानी पुनरागमन करणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही. दिशाने नुकतेच दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यामुळे त्याच्या पुन्हा येण्याबाबत साशंकता आहे. शैलेश लोढा यांनी या शोचा निरोप घेतला असला तरी आता एका अभिनेत्रीचा प्रवेश होणार आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो आहे. मालिकेतील पात्र पोपटलाल म्हणजेच श्याम पाठकचे पात्र हे या शोचे आवडते पात्र आहे. तो रसिकांना खूप हसवतो. या शोमध्ये अभिनेत्री खुशबू पटेलची नवीन एंट्री होणार आहे, त्यात ती पोपटलालची प्रेयसी आहे. या शोमध्ये पोपटलाल लग्नासाठी मुलगी शोधत आहे. यावेळी तरी त्याची लग्नाची इच्छा पूर्ण होते की नाही? हे पाहावे लागेल.
जेठालाल आणि दया बेनच्या जोडीने शोमध्ये सर्वांना खूप हसवले, अशा परिस्थितीत जेव्हा दया बेनच्या पुनरागमनाची बातमी आली तेव्हा जेठालाल बनलेले दिलीप जोशी म्हणाले, ती येणार की नाही हे फक्त प्रोडक्शन हाऊसच सांगू शकेल. मात्र या शोला अजूनही प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे याचा मला आनंद आहे.
दिशा वकानीने २०१७ मध्ये शोमधून मॅटर्निटी ब्रेक घेतला होता. तिने एका मुलीला जन्म दिला होता. दरम्यान, दिशाच्या पुनरागमनाची अनेकवेळा चर्चा होती मात्र तसे झाले नाही. नुकतेच तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यामुळे काही काळ तरी आता दिशा वकानी या शोमध्ये दिसणार नाही असे वाटते.