इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मालिका किंवा चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना अपघात घडल्याचे अनेक प्रसंग आहेत. नुकतीच अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने मालिकेच्या सेटवरच केलेली आत्महत्या ही सर्वांसाठीच धक्कादायक होती. या प्रकाराने धास्तावलेले निर्माते आपल्या कलाकारांची अधिक काळजी घेऊ लागले आहेत. असे असतानाच आता आणखीन एक गंभीर घटना घडली आहे. ‘बडे अच्छे लगते हैं २’ या मालिकेच्या सेटवर एक मोठा अपघात झाला असून अभिनेत्री अलेफिया कपाडिया हिला गंभीर दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ‘बडे अच्छे लगते हैं २’ या मालिकेच्या सेटवर मालिकेतील एका डान्सचे शूटिंग सुरू होते. अभिनेता अभिनव अलेफियासमोर उभा होता आणि इतर कलाकार नृत्याचा सराव करण्यात व्यग्र होते. इतक्यात तिच्या पायावर लाईट पडला. वेदनेने कळवळून ती खाली बसली. आणि यानंतर लगेचच अलेफिया तिच्या मेकअप रूममध्ये गेली. बराच वेळ ती रूममधून बाहेर न आल्यामुळे तिच्या सहकलाकारांना या अपघाताबद्दल समजले. यानंतर अलेफिया म्हणाली, “माझ्या पायाच्या बोटाला सूज आली असून त्याचं नख काळं निळं झालं आहे. यामुळे माझ्या पायाला असह्य वेदना होत आहेत आणि मला चालणंही कठीण झालं आहे. त्यामुळे सध्या मी आराम करत असून डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचना मी पाळत आहे.”
दाक्षिणात्य चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना स्टंटमन एस. सुरेश याचा देखील मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. अपघातामुळे अलेफिया सध्या शुटिंगमधून ब्रेक घेऊन आराम करत आहे. तिच्या पायाला झालेली जखम बरी झाली की ती पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात करेल. या मालिकेत पुढील काही भागांमध्ये तिची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.
TV Serial Shooting Accident Actress Alefia Injured