इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्व जितकं ग्लॅमरस आहे तितकंच ते मृगजळ आहे. इथे तुम्हाला रोज स्वतःला सिद्ध करावं लागतं. अन्यथा या क्षेत्रातून बाहेर फेकले जाणे अटळ आहे. त्याहीपेक्षा येथून बाहेर पडलं की, सामान्य माणसाप्रमाणे जगणं अत्यंत कठीण असतं. याची अनेक उदाहरणे आहेत. अशाच प्रकारे एका अभिनेत्रीला सध्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. आपली गुजराण करण्यासाठी ती चक्क कॉल सेंटरमध्ये काम करते आहे.
एकता कपूरच्या ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’, ‘कुसुम’ आणि ‘बेपनाह प्यार’ यांसारख्या मालिकांमध्ये एकता शर्मा हिने भूमिका केल्या होत्या. एकता बऱ्याच काळापासून अभिनयापासून दूर आहे. गेल्या काही वर्षांत तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. याच दरम्यान तिला कोणत्याही मालिकेत कुठलंही काम मिळत नव्हतं. शेवटी घर चालवण्यासाठी तिने एका कॉल सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
अभिनयाच्या ऑफर्स मिळत नव्हत्या
एकता शर्माने मध्यंतरी या क्षेत्राबद्दलची आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. २०२० मध्ये ‘बेपनाह प्यार’ या मालिकेत ती शेवटची दिसली होती. त्यानंतर कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे तिला कामच मिळालं नाही. नुकत्याच एका मुलाखतीत एकताने तिच्या सध्या सुरू असलेल्या संघर्षावर भाष्य केलं आहे. एकता म्हणाली, “मला अभिनयाच्या ऑफर्स मिळत नव्हत्या. त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. फक्त घरी बसून अभिनयाची चांगली संधी येण्याची वाट मी वाट पाहू शकत नव्हते. मला माझं काम आवडतं आणि मला लवकरच अभिनयक्षेत्रात परत यायचं आहे. मी सतत ऑडिशन्स आणि लुक टेस्ट देत असते. मला आशा आहे की लवकरच काहीतरी चांगलं होईल.”
दोन दशके काम करुनही
एकता केवळ तिच्या करिअरमध्येच संघर्ष करत नाही तर तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. ती सध्या तिच्या आठ वर्षांच्या मुलीच्या पालकत्वासाठी न्यायालयात लढा देत आहे. कठीण परिस्थितीतही तिने आशा सोडलेली नाही. लवकरच सर्व काही सुरळीत होईल असा तिला विश्वास आहे. सध्याच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ती सध्या कॉल सेंटरमध्ये काम करते आहे. त्याबद्दल ती म्हणते, “कॉल सेंटरमध्ये काम करणं ही वाईट गोष्ट नाही. पण टीव्ही इंडस्ट्रीमध्ये दोन दशकं काम करूनही आज मला काम मिळत नाही हे दुःखद आहे. मी माझ्या दिवंगत वडिलांची आभारी आहे की त्यांनी मला अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी माझं शिक्षण पूर्ण करण्यास सांगितलं. त्यांच्या सांगण्यावरून मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्याच्याच जोरावर मी इतर क्षेत्रात आज पैसे कमावू शकतेय.
यांच्यावर नाराज
एकता म्हणते, “मी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकांवर नाराज आहे, जे मदतीसाठी पुढे येत नाहीत आणि कामही देत नाहीत” अशीही खंत तिने व्यक्त केली. एकता शर्माने १९९८ मध्ये सीआयडीमधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पण २००१ मध्ये ‘कुसुम’ या मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली. यानंतर ती एकता कपूरच्या अनेक मालिकांमध्ये दिसली.
TV Actress Life Struggle Call Centre Work
Ekta Sharma Entertainment