नाशिक – ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या झी मराठी वाहिनीच्या लोकप्रिय मालिकेतील सिद्धार्थ आणि आदिती या दोघांच्या शुभविवाहाचे शूटिंग नाशिक मध्ये पार पडले असून आता रविवार दि.२६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणाऱ्या दोन तासांच्या विवाह विशेष एपिसोडकडे प्रेक्षकांच्या नजरा खिळून राहिल्या आहेत.
एकत्र कुटुंब पद्धती ही सध्या सगळीकडेच लोप पावलेली दिसत असताना, एका मोठ्या एकत्र कुटुंबातून आलेला सिद्धार्थ हा मालिकेचा नायक आणि दुसरीकडे छोट्या कुटुंबातून आलेली आदिती यांचा विवाह, हा या मालिकेतील कथानकाचा एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो आहे. यानंतर या दोघांच्या प्रेमकहानीचे कथानक कसा आकार घेईल,याकडे सगळ्याच मराठी प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
या आधी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून राणा दा हे कसदार पाञ समर्थपणे पार पाडलेला हार्दिक जोशी हा कलावंत या मालिकेत सिद्धार्थची एक वेगळी भूमिका करत असून अमृता पवार ही गुणी अभिनेत्री आदितीच्या भूमिकेत आपल्याला दिसते आहे. याखेरीज, या मालिकेत शुभम पाटील, अंजली जोशी, प्रशांत गरुड, रेखा कांबळे, चित्र कुलकर्णी, पुनम चव्हाणदेशमुख यांच्याही या मालिकेत भूमिका आहेत.