तुळजापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानीला अर्पण करण्यात आलेले सोन्याचांदीचे दागिने गायब झाल्याचा प्रकार उघडकीसा आला आहे. या गैरप्रकारावर भाविकांनी संताप व्यक्त केला आहे.
आई तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अध्यात्मिकदृष्ट्या हीचे महात्म्य मोठे आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मोठ्या प्रमाणात दागिने, रोख अर्पण करण्यात येतात. या पार्श्वभूमीवर घडलेल्या प्रकाराने मंदिरातील गलथान व्यवस्थापन पुढे आले आहे. तुळजाभवानी मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने, देवीच्या पादुका, माणिक-मोती, वेगवेगळ्या राजे-महाराजांनी देवीचरणी अर्पण केलेली ७१ मौल्यवान दुर्मिळ नाणी अद्यापही गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तीन अधिकार्यांसह पाच जणांवर त्रिसदस्यीय समितीने ठपका ठेवला होता. मात्र त्रिसदस्यीय समितीने दोषी ठरविलेल्या पाचजणांपैकी चार जणांना क्लिनचिट देऊन केवळ एकाच व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. सोने-चांदीच्या दागिन्यांचे मोजमाप करताना पुन्हा एकदा तुळजाभवानी मंदिरातील दुर्मीळ मौल्यवान दागिन्यांचा काळाबाजार चव्हाट्यावर आला आहे.
यामुळे पुढे आले प्रकरण
विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात भाविकांनी मोठ्या श्रध्देने अर्पण केलेले सोने-चांदी वितळविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सोने वितळविल्यानंतर तब्बल ५५ किलोची तूट कागदोपत्री नोंद करण्यात आली आहे. मागील १३ वर्षांत २०४ किलो सोने आणि ८६१ किलो चांदी भाविकांनी अर्पण केली आहे. ती वितळविण्यापूर्वी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोने-चांदीचे मोजमाप करण्यासाठी समिती गठीत केली होती. या समितीने मागील दोन महिन्यात मंदिरातील पुरातन दागिने, भाविकांनी अर्पण केलेले दागिने आणि महंतांच्या ताब्यात असलेले तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिन्यांचे मोजमाप केले आहे. यावेळी देवीच्या तिजोरीवर मंदिराचा कारभार हाकणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच डल्ला मारल्याचे उघड झाले आहे.