त्र्यंबकेश्वर – शहरातील श्रीकृष्ण नगर परिसरातील शिवालय पॅलेस मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. तीन जणांनी एका युवकावर धारदार शस्त्राने वार केले आहेत. या घटनेत युवक अतिशय गंभीर जखमी झाला आहे.
मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान मनोज बाळु पवार (वय 30, रा. शिवालय पॅलेस) या युवकावर अकील वटाणे (रा. गोरठाण) व त्याचे तीन सहकारी यांनी तीक्ष्ण हत्याराने पाठीवर व पोटावर सपासप वार केले. तसेच, या युवकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अकील हा मित्रांसह फरार झाला आहे. याप्रकरणी जखमी युवकाच्या सासऱ्यांनी चंदर तुकाराम मराडे (वय 40, रा. वेळुंजे) त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवालय पॅलेस ही बिल्डींग चंदर मराडे हे लाॅजिंग साठी वापर करतात. त्यांच्याकडे संशयित आरोपी अकिल वटाणे हा लाॅजिंगच्या कामाला होता. संशयित आरोपी याचे चंदर यांच्या मुलीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळेच जावई मनोज यांनी अकिलला कामावरुन काढून टाकले होते. याचा राग मनात धरुन अकील हा मित्रांसह रात्री साडेबाराच्या सुमारास शिवालय पॅलेसमध्ये आला. तेथे त्याने मनोज याच्यावर तीक्ष्ण हत्याराने अनेक वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मनोज हा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला.
जखमी मनोज यास त्वरीत त्र्यंबक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारार्थ नाशिक येथे नेण्यात आले. तशी फिर्याद चंदर मराडे यांनी दिली आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्यासह तसेच सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे व त्र्यंबक पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक यल्लप्पा खैरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे (कैचे), पोलीस नाईक मेघराज जाधव, श्रावण साळवे अधिक तपास करीत आहेत.