त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील रिंगरोड लगत असलेल्या भांगरे आळी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. मोकळ्या मैदानात अखिल योगेश गमे (वय 12) हा मुलगा शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास खेळत होता. त्याचवेळी भुयारी गटारीच्या कामासाठी आलेल्या पोकलेन मशीनचा धक्का त्याला लागला. अखिल हा मशिनच्या चेन खाली सापडल्याने जबर जखमी झाला. त्यास तातडीने देवस्थानच्या रूग्णवाहिकेतून उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने वैद्यकीय अधिका-यांनी त्यास नाशिक जिल्हा रूग्णालयात पाठविले. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच भांगरे आळी परिसरातील युवकांनी तेथे धाव घेतली. मात्र तोपर्यंत अपघातास कारण ठरलेले पोकलेन व भुयारी गटार खोदत असलेले अन्य चार पोकलेन आणि जेसीबी या सर्वांचे चालक तेथून पळून गेले. संतापलेल्या जमावाने दगडफेक करत सर्व पोकलेन आणि जेसीबीच्या काचा फोडल्या. दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे, उपनिरीक्षक चंद्रभान जाधव, अश्विनी टिळे यांच्यासह कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला आहे. तेथे जमलेल्या युवकांनी भुयारी गटारीचे काम करणा-या ठेकेदाराच्या कार्यपध्दती बाबत नाराजी व्यक्त केली आहे. जेसीबी अथवा पोकलेन रस्ता खोदण्यासाठी आणले आहेत. ते मोकळ्या जागेत नेण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, या सर्व कामकाजाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संबंधितांवर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.