त्र्यंबकेश्वर – रायगड मधील तळीये गावच्या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या मेटघर किल्ला ग्रामपंचायतीच्या अंतर्गत सुपलीची मेट व इतर सात वाड्या यांचे पुनर्वसन करण्याच्या बाबत प्रांत अधिकारी व तहसीलदार दिपक गिरासे यांच्या मार्फत रहिवाशांमध्ये चर्चा संपन्न झाली. यावेळी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरण करावे का? असं प्रांत अधिकारी यांनी नागरिकांना विचारले असता, आज पावतो आम्ही सुरक्षित आहोत, आमची शेती इथे आहे, अजून तरी आम्हाला काही धोका निर्माण झाला नाही, प्रसार माध्याम चुकीच्या बातम्या दाखवत आहे, अजून तरी पुनर्वसन करण्याची गरज नसल्याचे ग्रामस्थ भिकन बदादे, संतोष आचारी, पोलीस पाटील किसन झोले यांनी चर्चेत सांगितले.
अजून तरी सुपलीच्या मेटेला धोका नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले, आमची शेती, गुरे, वासरे, इथेच आहे, तुम्ही आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात कुठेही जरी नेले तरी आम्हाला दररोज इथेच लागेल, आमचं सर्वच इथे आहे.
ब्रह्मगिरिला भेट देणाऱ्या भाविकांमुळे आम्हाला रोजगार भेटत असतो, आमचा बारा महिने रोजगार बुडेल, पूर्वजांपासून आम्ही इथेच राहतो, आम्हाला काही त्रास नाही, प्रसार माध्यमातुन सुपलीच्या मेट संदर्भात ब्रह्मगिरी वरून दगड पडल्याच्या बातम्या येत आहे, दगड पडला खरा परंतु तो दगड पुढच्या बाजूने पडला, सुपलीच्या मेटचा आणि त्याचे अंतर खूप लांब आहे, आज पर्यंत सुपलीची मेट मध्ये कुठलाही दगड पडलेला नाही. आम्हाला आता तरी पुनर्वसन करण्याची गरज नाही, इथे ब्रह्मगिरी कडे जे भाविक येतात त्यांच्या मुळे येथील नागरिकांना रोजगार मिळत आहे. अशा भावना जगन झोले (सरपंच मेटघर किल्ला ग्रामपंचायत) यांनी व्यक्त केली.
यावर यापुढे या भागात उत्खनावर प्रशासन लक्ष ठेऊन आहे, तुमचे योग्य जागी व तुमची शेती व व्यवसाय या बाबत योग्य तो विचार करून तसेच रोजगाराच्या साधनेवर कुठलीही गदा येणार नाही. याचा विचार करून पुनर्वसन होईल याची शाश्वती प्रांत अधिकारी तेजस चव्हाण यांनी दिली. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ब्रह्मगिरीचे सिमांकन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, थोड्याच दिवसात किल्ले ब्रह्मगिरीच्या सीमा निश्चित होतील असे ते म्हणाले.
तहसीलदार गिरासे यांनी अतिवृष्टीमुळे या भागात काही अनुचित प्रकार घडला तर पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्थ यांनी तात्काळ संपर्क करावा असे आव्हान केले. यावेळी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दिपक गिरासे, पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे, सहायक गटविकास अधिकारी एस.जी.पाठक. विस्तार अधिकारी बी.एस.पवार. मंडल अधिकारी हेमंत कुलकर्णी , तलाठी संतोष जोशी, ग्रामसेवक विलास पवार, सरपंच जगन झोले, भिकन बदादे, शंकर बदादे, हिरामण जाधव, हरी झोले, विष्णू बदादे, यांसह ग्रामस्थ उपस्थितीत होते.
तो रस्ता प्राधान्याने
महादरवाजा येथील पाणी, रस्ता व मूलभूत सर्वच प्रश्नासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे गेले ३ वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. सुपलीची मेट पाहणीची वेळी पुन्हा एकदा हे प्रश्न मांडले यावेळी प्रांतधिकारी तेजस चव्हाण यांनी महादरवाजा मेट येथील रस्ता प्राधान्याने घ्यावा, अशा सूचना जिल्हा परिषद अभियंता शिरसाठ यांना दिल्या.