त्र्यंबकेश्वर – प्रसिद्ध ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर गर्भगृह प्रवेशासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची वेळ येऊ देऊ नये. असे मत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरीजी महाराज यांनी त्र्यंबकेश्वरी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. मंदिरात गर्भगृहात जाण्यास श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने मनाई केलेली आहे. बंदी मागे घ्यावी अशी मागणी आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरीजी महाराज यांनी केली आहे.
महाराज म्हणाले की, कोविड काळ आणि प्राचीन पिंडीचे रक्षण व्हावे या हेतूेने पिंडीजवळ जाण्यास श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने ट्रस्टने सध्या मनाई केली आहे. सोवळे नेसून पिंडीजवळ जाण्याची पद्धत आहे. पुरोहितांबरोबरच साधूंना सुध्दा सध्या गर्भगृहात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. याबाबत स्थानिक साधू महंत यांच्या वतीने देवस्थान ट्रस्टला पत्र देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर ते सौराष्ट्र सोमनाथ ही ज्योतिर्लिंगांची दोन ठिकाणे रेल्वेने जोडावेत अशी मागणी आखाडा परिषदेच्यावतीने श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे संरक्षक व आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरीजी महाराज यांनी केली आहे.
महामंडलेश्वर नगर पिंपळद येथे भेट दिल्यानंतर नील पर्वतावर ते बोलत होते. सौराष्ट्र (गुजरात) व त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र) हे दोन ज्योतिर्लिंगे डहाणू या रेल्वे मार्गाने जोडता येतील. यासाठी गुजरात सरकार, महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांचे आखाडा परिषदच्या माध्यमातून पुन्हा लक्षवेधू असेही ते म्हणाले. आगामी २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्या पुर्वी त्र्यंबकेश्वर रेल्वेने जोडावे अशी मागणी वाढत आहे.