त्र्यंबकेश्वर – पौराणिक महत्व व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गंगाद्वार पर्वतावरील गोमुख स्थानासमोर दरड कोसळली आहे. लाॅकडाऊनमुळे भाविक नसल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी या प्रकाराला नक्की जबाबदार कोण, हा प्रकार नक्की कशामुळे घडला असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच, ब्रह्मगिरी परिसरातील उत्खननाच्या प्रकारांमुळे हे झाले आहे का, असा तर्कही लावला जात आहे.
त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर दक्षिण गंगा गोदावरीचं उगमस्थान आहे. येथुन गुप्त झालेली गंगा गंगाद्वार पर्वतावर गोमुखातून प्रकट झाली. तसेच येथे श्री कोलांबिका माता मंदिर, १०८ महादेव गुफा, नाथ सांप्रदयांचे श्रध्दास्थान असलेले गुरु गोरक्षनाथ गुफा, अनुपान शिला असे पौराणिक महत्व असलेले श्रध्दास्थान आहेत. यामुळे येथे दर्शनासाठी रोज असंख्य भाविक येतात. त्याचप्रमाणे निसर्गरम्य वातावरण असल्याने पर्यटकांची देखील येथे गर्दी असते.
स्थानिक नागरिक येथे दररोज व्यायामासाठी येत असतात. शिवाय या परिसरात किरकोळ लोकवस्ती देखील आहे. ऊन-पावसामुळे दगड आकुंचन वा प्रसरण पावतात. त्याचप्रमाणे डोगरांवर उगवणार्या वनस्पती या दगड मोकळे करतात. तसेच, ब्रह्मगिरी परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन कार्य सुरू आहे. त्यामुळेच गंगाद्वार येथे दरड कोसळण्याची घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
सकाळी दहा वाजेच्या दरम्यान गोमुख आणि श्रीकोलांबिका देवी मंदिरा समोरील पटांगणात वरच्या बाजूने दरड कोसळली. लहान-मोठे दगड गोटे मोठ्या प्रमाणात यावेळी कोसळले. सध्या लाॅकडाऊनमुळे येथील मंदिरे, धार्मिक पुजापाठ बंद आहेत. त्यामुळे भाविकांची संख्या नगण्यच आहे. त्यामुळे डोंगरावर देखील शुकशुकाटच आहे. डोंगरावर कोणीही नसल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. मागील काही वर्षांमध्ये अशा घटनांमुळे दहा बारा भाविक जखमी झाले असल्याची माहिती गंगाद्वार पर्वतावरील श्रीगंगा गोदावरी देवस्थानचे पुजारी वेदमुर्ती आशुतोष महाजन यांनी दिली.
अशा घटना तसेच दुर्घटना टाळण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने श्री सप्तशृंग देवी डोंगराच्या धर्तीवर येथील डोंगराला जाळी लावावी तसेच ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.