त्र्यंबकेश्वर – कोविड काळ व संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्यात होणाऱ्या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला स्थगिती देण्यात आली आहे. प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी याबाबत प्रसारमाध्यामांना माहिती दिली आहे. शासनाच्या आताच्या निर्देशानुसार हा निर्णय असल्याचे म्हटले आहे.
प्रसिद्ध पत्रकांत म्हटले आहे की, अद्यापही कोरोना विषाणू संसर्ग पूर्णपणे संपलेला नसल्याने तसेच आगामी कालवधीत संभाव्य लाटेची शक्यता आहे. त्यामुळे या वर्षी ऑगस्ट 2021 मधील श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताला घालण्यात येणार्या प्रदक्षिणेत कोरोनाचा संसर्ग वाढू नये यादृष्टीने या वर्षी श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी प्रदक्षिणा शासनाच्या सध्याच्या निर्देशानुसार स्थगित करण्यात येत आहे.
भाविकांनी त्र्यंबकेश्वर परिसरात प्रदक्षिणेसाठी येण्याचे टाळावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहे. यावेळी तहसीलदार दीपक गिरासे, पोलिस अधिकारी संदिप रणदिवे, गट विकास अधिकारी किरण जाधव, प्रदक्षिणा मार्गातील गावांचे तलाठी, ग्रामसेवक यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेवर बंदी घातल्याने भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.