इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कृत्रिम उपग्रहांना अवकाशात सोडण्यासाठी रॉकेटचा वापर करण्यात येतो, परंतु काही वेळा रॉकेट फेल (अयशस्वी) जाऊ शकते. अशा फेल होणाऱ्या रॉकेटचा पुन्हा एकदा वापर करता येईल का, असा विचार शास्त्रज्ञांनी केला. त्यासाठीच अशा कोसळणाऱ्या रॉकेटला चक्क हेलिकॉप्टरच्या साह्याने पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरला.
न्यूझीलंड मधील रॉकेट लॅबने त्याचे छोटे इलेक्ट्रॉन रॉकेट पुन्हा वापरण्यायोग्य बनवण्याचा प्रयत्न केला. याअंतर्गत हेलिकॉप्टरच्या साहाय्याने उपग्रहांना अवकाशात नेण्यासाठी वापरण्यात आलेले रॉकेट पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते पकडताच हेलिकॉप्टरच्या क्रू मेंबर्सना सुरक्षेच्या कारणास्तव ते सोडावे लागले आणि रॉकेट खाली प्रशांत महासागरात पडले.
येथून त्याला बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. ऑपरेशन यशस्वी असल्याचे वर्णन करताना, कंपनीने अनपेक्षित लोड ही एक किरकोळ समस्या मानली, ती लवकरच दुरुस्त केली जाईल. याबाबत रॉकेट लॅबचे सीईओ पीटर बेक यांनी सांगितले की, उपग्रह अवकाशात पाठवल्यानंतर हेलिकॉप्टरमधून पृथ्वीवर परतणाऱ्या रॉकेटला पकडण्याचे काम खूप गुंतागुंतीचे आहे. त्यांनी या कामाची तुलना ‘सुपरसॉनिक बॅले’शी केली. पण त्यात सुधारणा केली जाईल.
एक इलेक्ट्रॉन रॉकेट प्रक्षेपित करण्यात आला आणि मुख्य बूस्टर विभाग पृथ्वीवर पडण्यापूर्वी 34 उपग्रह कक्षेत पाठवले. पॅराशूटने त्याचे उतरणेही मंद केले. त्यानंतर, हेलिकॉप्टरच्या क्रू सदस्यांनी पॅराशूटद्वारे रॉकेटला रोखले, परंतु हेलिकॉप्टरवरील एकूण भार चाचणी आणि ‘सिम्युलेशन’ पॅरामीटर्सपेक्षा जास्त होता आणि म्हणून त्यांनी ते कमी करण्याचा निर्णय घेतला.