इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लसीकरणाची सक्ती केल्याच्या विरोधात कॅनडातील हजारो ट्रक ड्रायव्हर्सने देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला घाबरुन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी अखेर संपूर्ण देशात आणीबाणी लागू केली आहे. कॅनडाच्या इतिहासात प्रथमच आणीबाणी परिस्थितीचा कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे फेडरल सरकारला कोरोना निर्बंधांविरूद्ध सुरू असलेले व्यत्यय व निषेध हाताळण्यासाठी अतिरिक्त अधिकार मिळणार आहेत. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सांगितले की, ट्रक चालकांच्या देशव्यापी संपाच्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कठीण काळात वापरले जाणारे हत्यार म्हणून आणीबाणी लागू केली. ही कारवाई आमच्या अर्थव्यवस्थेच्या तसेच जनतेच्या सुरक्षिततेवर आधारित आहे. आम्ही बेकायदेशीर आणि जोखमीच्या कामांना वाढ होऊ देऊ शकत नाही.
ट्रक आंदोलकांनी अनेक रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे संपूर्ण व्यवस्था कोलमडली आहे. तसेच, पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. आंदोलकांनी राजधानीसह महत्त्वाच्या शहरांचे मुख्य रस्ते बंद करुन नाकाबंदी केली आहे. त्याचा मोठा परिणाम तेथील जनजीवनावर झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सर्व आंदोलकांना घरी जाण्याचे आवाहन केले. आणि सांगितले की, ही बेकायदेशीर कृती संपली पाहिजे आणि ती संपेल अशी आम्हाला आशा आहे. आंदोलक हे घरी जाण्याचा निर्णय घेतील अन्यथा पोलिस हस्तक्षेप करतील. उल्लेखनीय हे आहे की, कॅनडामध्ये कोरोनाची लस अनिवार्य करण्यासाठी सुरू झालेले प्रात्यक्षिक आता मोठे संकट बनत आहे. हजारो ट्रक चालक त्यांच्या ट्रकसह निदर्शने करत आहेत. त्यामुळे राजधानी ओटावामधील अनेक भागात वाहतूक ठप्प झाली आहेत. ओटावामध्ये 50 हजारांहून अधिक ट्रक चालक निदर्शने करत आहेत आणि आंदोलक पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.