त्रिपुरारी पौर्णिमा – देव दिवाळी
पंडित दिनेश पंत, इंडिया दर्पण वृत्तसेवा
दरवर्षी दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी देव दिवाळी साजरी केली जाते. देव दिवाळीला त्रिपुरारी पौर्णिमा अथवा कार्तिक पौर्णिमा असे म्हटले जाते. यंदा ७ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या पौर्णिमेचे वेगळे असे महत्त्व आहे.
चातुर्मास संपवून आलेल्या भगवान विष्णू यांना भगवान शंकराने वैश्विक कारभार सांभाळण्याची सूत्रे पुन्हा सुपूर्द केली तो हा दिवस. म्हणजेच या दिवशी हरी म्हणजे विष्णू व हर म्हणजे भगवान शंकर यांची भेट झाली. म्हणून या दिवसाला हरिहर भेट दिवस अशी शिव व विष्णू भक्तांमध्ये विशेष मान्यता आहे.
संपूर्ण सृष्टीला त्राही माम करून सोडलेल्या त्रिपुरा सूर नावाच्या राक्षसांचा वध भगवान शंकरांनी याच दिवशी केला त्याचा विजय उत्सव म्हणून हा सण साजरा केला जातो. शेकडो दिव्यांची आरास करून त्याचप्रमाणे ७५० वाती एकत्र करून तयार केलेली विशिष्ट प्रकारची त्रिपूर वात लावून हा सण साजरा केला जातो.
तुलसी विवाह सांगता याच दिवशी होते. भगवान कार्तिकेय म्हणजेच कार्तिकस्वामी यांच्या दर्शन व पूजनास या दिवशी विशेष महत्त्व आहे. हरिहर भेटीमुळे या दिवशी भगवान विष्णू व भगवान शंकर यांना प्रिय असलेल्या अनुक्रमे तुळस व बेलपत्र ही दोन्ही एकत्र पद्धतीने यावेळच्या पूजेमध्ये वाहिले जातात. या दिवशी माती किंवा तांब्याच्या दिपदानाला विशेष महत्त्व आहे. विष्णुसहस्रनाम त्याचप्रमाणे महारुद्र करण्याचा प्रघात आहे.
त्रिपुरारी पौर्णिमा पूजा विधी व साहित्य
त्रिपुरारी पौर्णिमेला घरी करणार असलेले पूजा पुढीलप्रमाणे.
सायंकाळी पाट अथवा चौरंगावर लाल वस्त्र मांडून त्यावर गणपती त्याचप्रमाणे विष्णू लक्ष्मी व शिवप्रतिमा ठेवावी. त्यासमोर प्रत्येकी एक अशा मुठभर तांदळाच्या नऊ राशी मांडाव्या. तांदळाच्या राशीवर फुले, तुलसी पत्र व बेलपत्र वहावे. विष्णूसहस्रनाम व महारुद्र करून हरिहर प्रतिमेची सोडशोपचारे पूजा करावी. धूप, दीप त्याचप्रमाणे मंगल वाद्य लावून महानैवेद्य दाखवावा. त्यामध्ये खीर अवश्य ठेवावी. पाटाच्या आजूबाजूने समई, पणती त्याचप्रमाणे घराचे मुख्य प्रवेशद्वारा मध्ये सुशोभित रांगोळी काढून आकाश कंदील व पणत्यांची आरास त्याचप्रमाणे विद्युत रोषणाई करावी.
गणपती महालक्ष्मी भगवान विष्णू व भगवान शिव यांच्या आरती करावी. सर्वच मंदिरांमध्ये दगडी दीपमाळा त्याचप्रमाणे मंदिर परिसर व सर्वच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी त्याचप्रमाणे नदीपात्रात त्रिपुरारी पौर्णिमेला हजारो दिव्यांची रोषणाई केली जाते.
त्रिपुरारी पौर्णिमा मुहूर्त
७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.१५ पासून ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३१ पर्यंत आहे.
Tripurari Paurnima Importance and Muhurta
Festival Tradition