इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तीन तलाकविरुद्ध लढा देणाऱ्या आला हजरत हेल्पिंग सोसायटीच्या अध्यक्षा निदा खान यांना पुन्हा विरोधाचा सामना करावा लागला. एका लग्नासमारंभात गेलेल्या निदा यांच्याविरुद्ध भाजप सोडण्याचा दबाव टाकून घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्यासह कुटुंबीयांवर हल्ला झाल्याचा आरोप निदा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
निदा खान या आला हजरत हेल्पिंग सोसायटीच्या संचालिका आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांचे विरोधक संतप्त झाले आहेत. निदा यांच्या तक्रारीनुसार, त्या मामाच्या मुलीच्या लग्नासाठी २६ मार्च रोजी पिलिभित रोड येथील एका कार्यालयात पोहोचल्या होत्या. तिथे काही नागरिकांनी त्यांच्यावर भाजपला सोडचिठ्ठी देण्यासाठी दबाव टाकला आणि घोषणाबाजी केली. या लग्नात त्यांचे कुटुंबीयसुद्धा होते.
निदा म्हणाल्या, लग्नात पोहोचण्यापूर्वी मामाचा मुलगा बरकात याने मला मेसेज केला, की माझे काका तस्तिम मियां, शिरान रझा, अर्सलान, माझे मामा जरताब आणि बुरहान विरोध करत आहेत. निदा यांनी भाजप सोडला तरच तिला येथे येण्याची परवानगी द्यावी, अथवा त्यांना लग्नात येऊ दिले जाणार नाही, अशी अट त्यांनी ठेवली. जर त्या जबरदस्तीने लग्नात आल्या तर त्यांना ठार मारले जाईल, अशी धमकी त्यांनी दिली.
निदा यांच्या आरोपानुसार, त्या लग्नात पोहोचल्या तेव्हा तिथे उपस्थित गर्दीतील नागरिकांनी त्यांना घेरले. घेरलेल्या नागरिकांमध्ये धमकी देणारे नातेवाईकसुद्धा होते. त्यांना शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी देऊ लागले. जिवे मारण्याच्या उद्देशाने धारदार हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. माहिती देताच पोलिस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा
हल्लेखोरांनी तेथून पलायन केले. लग्नाच्या दोन दिवसांनंतर वलिमा विधीसाठी तेथे न येण्याची धमकी मिळाली. या सर्व घटनेमुळे त्यांचे कुटुंबीय भयभीत झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.
कोण आहे निदा खान
शहदाना मोहल्ला येथील रहिवासी मुशर्रत यार खान यांची मुलगी निदा खान यांचा विवाह शिरान रजा खान यांच्याशी झाला होता. निदा यांचा हुंड्यासाठी छळ करून त्यांचे शिक्षण थांबविण्यात आले होते. या प्रकरणात निदा यांनी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. निदा यांच्याविरुद्ध इस्लाम धर्मातून काढून टाकण्याचा फतवा काढण्यात आला होता. तीन तलाक प्रकरणात त्यांनी दीर्घकाळ लढा दिला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना विरोधाचा सामना करावा लागला होता.