लखनऊ (उत्तर प्रदेश) – पैशाच्या वादातून एखादी व्यक्ती काय करेल याचा नेम नसतो. अगदी किरकोळ भांडणातून कुणाचा जीव देखील जाऊ शकतो. अशीच एक घटना घजली आहे. आईच्या पेन्शनसाठी एकाने आपल्याच घरातील तीन जणांचा जीव घेतला आहे. मिर्झापूर शहरातील कटरा कोतवाली परिसरातील डांगर परिसरात हा भयानक प्रकार घडला आहे. आईच्या पेन्शनसाठी दीराने थेट वहिनी, पुतण्या आणि पुतणी यांच्यावर थेट कुऱ्हाडीने वार करुन त्यांची हत्या केली. तर पुतण्या गंभीर जखमी झाला. त्याला प्राथमिक उपचारानंतर वाराणसी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रात्री उशिरा त्याचाही मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईला मिळणाऱ्या पेन्शनच्या पैशांवरून मोठा वाद होता. त्यातून ही घटना घडली आहे. कलावती देवी यांना दोन मुले आहेत. यज्ञनारायण उर्फ जोखू आणि रामनारायण उर्फ टिटू अशी त्यांची नावे आहेत. जोखू हा त्या माहिलेचा मुलगा (रा. कटरा) हा कोतवाली परिसरातील पोस्टमन आहे. त्याची पत्नी रेणू, मुलगी हर्षिका आणि मुलगा आरुष हे घरी होते. हे तिघे जण घराच्या गच्चीवर होते. त्याचवेळी टिटू घरी आला. कलावती या कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. घरात तिघांशिवाय कुणीच नाही हे पाहून टिटूने रेणू, हर्षिका आणि आरुष यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. हे वार एवढे भीषण होते की रेणू आणि हर्षिका दोन्ही जागीच ठार झाले. तर, आरुष गंभीर जखमी झाला. घरातील हा गंभीर प्रकार आणि रेणूसह दोन्ही मुलांनी केलेल्या आरडाओरडामुळेआजूबाजूचे नागरिकांनी घराकडे धाव घेतली. हे पाहून आरोपी टिटूने तेथून पळ काढला.
जखमी आरुषला तातडीने मंडल रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना वाराणसीला नेण्यास सांगितले. तेथे नेले असता रात्री उशिरा त्याचाही मृत्यू झाला. कात्रा कोतवाली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून फरार आरोपी रामनारायण उर्फ टिटूला अटक केली आहे. टिटूने कबूल केले की त्याने आईच्या पेन्शनसाठी तिघांची निघृण हत्या केली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.