त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर जून महिन्यात बर्फ जमा झाल्याचे दिसून आले होते. काहींनी त्याकडे दैवी चमत्कार म्हणून बघितले. तर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. स्वतः देवस्थान समितीने या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या तपासात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवरील बर्फ तुंगार ट्रस्टमधील तिघांनी ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे.
३० जून २०२२ रोजी पहाटे त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ आढळल्याचा दावा करण्यात आला होता. या घटनेचा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. हा प्रकार उघडकीस आल्यापासूनच वेगेवेगळे तर्क वितर्क लावण्यासोबतच दावे-प्रतिदावेसुद्धा केले गेले. देवस्थान समितीनेसुद्धा पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा बनाव करण्यात आल्याचा दावा केला होता. तशी तक्रार सुद्धा पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती. भाविकांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार असल्याने हे प्रकरण गंभीर आणि तेवढेच संवेदनशीलही असल्याने खबरदारी घेत तपास आवश्यक होता.
सत्यशोधन समितीकडून तपास
हा संपूर्ण घटनाक्रम पावसाळ्यातील होता. त्र्यंबकेश्वरचे हवामान आणि गर्भगृहातील तापमान पहाता बर्फ कसा तयार झाला यावर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. त्र्यंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष हे जिल्हा न्यायाधीश आहेत. त्यांनी या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेतली. संपूर्ण प्रकरणाचा बारकाईने तपास करण्याच्या दृष्टीने त्यांनी सत्यशोधन समिती स्थापन केली. सीसीटीव्ही फूटेज तपासात सर्वात महत्त्वाचे ठरले. फुटेजची पाहणी करण्यात आली, त्यात काही जण पिंडीवर बर्फ ठेवत असल्याचे दिसून आले होते.
खोट्या प्रचारासाठी धडपड
तुंगार ट्रस्टच्या तिघांनीच पिंडीवर हा बर्फ ठेवल्याचे समोर आले आहे. अमरनाथ प्रमाणेच त्र्यंबकेश्वरलाही बर्फ तयार झाला असा खोटा प्रचार केल्याचा ठपका सुशांत तुंगार, आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Trimbakeshwar Temple Ice 3 Trustee FIR Booked