त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी गुरुपुष्यामृताच्या दिवशी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मुबलक वेळ मिळावा, त्याअंतर्गत करण्यात येणार्या कामांना योग्यतो अवधी मिळुन कामे दर्जेदार व्हावीत, याकरीता गुरुपुष्यामृताच्या मुहुर्तावर विविध आखाड्यांचे साधुमहंत, पुरोहित संघ, स्थानिक लोक प्रतिनिधी, नगर परिषद अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरीकांच्या उपस्थितीत आज आगामी कुंभमेळा शाहीस्नानाच्या तारखा जाहिर करण्यात आल्या. कुंभमेळ्याची घोषणा करण्यात आल्यामुळे त्र्यंबक नगरीमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
आज घोषित झालेल्या तारखा अशा
३१ आॅक्टो. २०२६ – सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण
श्रावण शुध्द तृतीया, सोमवार, – दि. २४ जुलै २०२८ – कुंभमेळा समाप्ती अर्थात कुंभमेळा ध्वजावतरण
शाहीस्नानाच्या तारखा अशा
प्रथम शाहीस्नान – आषाढ वद्य अमावस्या, सोमवार – दि. २ आॅगस्ट २०२७ रोजी.
द्वितिय शाहीस्नान – श्रावण वद्य अमावस्या, मंगळवार – दि. ३१ आॅगस्ट २०२७ रोजी.
तृतीय शाहीस्नान – भाद्रपद शुध्द द्वादशी, रविवार – दि. १२ सप्टेबर २०२७ रोजी संपन्न होईल.
गुरुपुष्यामृत मुहुर्ताचं औचित्य साधुन षड् दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत सागरानंद सरस्वती महाराज, श्रीपंच दशनाम जुना आखाड्याचे मुख्य संरक्षक श्री हरिगिरीजी महाराज, महामण्डलेश्वर शिवगिरीजी महाराज, आनंद आखाड्याचे श्रीमहंत शंकरानंद सरस्वती महाराज, श्रीमहंत गणेशानंद सरस्वती महाराज, साध्वी शैलजा माता आदिंसह अनेक साधुसंतांनी कुशावर्त तिर्थामध्ये स्नान करुन भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी विविध आखाड्यांचे वंशपरंपरागत ऊपाध्ये वेदमुर्ती त्रिविक्रम जोशी, वेदमुर्ती प्रमोद जोशी, जयंत शिखरे, पंकज धारणे उपस्थित होते.
यानंतर उपस्थित साधुमहंत तसेच नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी संजय जाधव आदींच्या हस्ते कुशावर्त तिर्थावर गंगापुजन करण्यात आले. श्रीगंगामातेला साडीचोळी अर्पण करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे, माजी नगराध्यक्ष रविंद्र सोनवणे, बांधकाम सभापती दिपक लोणारी, आरोग्य सभापती सागर उजे, नगरसेवक विष्णु दोबाडे, अॅड. श्रीकांत गायधनी, भाजप शहराध्यक्ष सुयोग वाडेकर, पुरोहित संघाचे कार्याध्यक्ष मनोज थेटे, जयंत शिखरे, किशोर पेंडोळे, प्रख्यात ज्योतिषी राजेश दिक्षीत, विशाल गंगापुत्र, संपदा लोहगावकर, सुनिता भुतडा, वैष्णवी वाडेकर, संगिता मुळे आदींसह साधुसंत, नागरीक उपस्थित होते. यानंतर कुशावर्त चौकामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कुंभमेळा तारखांची घोषणा करण्यात आली. कुंभमेळ्याच्या तारखा निश्चित करण्याकरीता पुढील पंचांग अद्याप उपलब्ध होत नाहीये परंतु येथील प्रख्यात ज्योतिष अभ्यासक वेदमुर्ती राजेश दीक्षित यांनी यांनी सखोल अभ्यास करुन सदर तारखा निश्चीत केल्या.
यानंतर सर्व ताफा गोलदरी नदी परिसरात आला. गोलदरी नदीमध्ये भगवान परशुरामांनी स्नान केल्याची आख्यायिका असल्याची माहिती श्री हरिगिरी महाराजांनी दिली. त्र्यंबक नगर परिषदेच्या वतीने गोलदरी नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा तसेच परिसरातील परशुराम कुंडाच्या संवर्धन कामासही सुरुवात करण्याचा शुभारंभ साधुमहंतांच्या उपस्थितीत करण्यात आला. हॉटेल सितारापासून महामंडलेश्वर नगर रस्त्यास श्रीपंचदशनाम जुना आखाडा गुरूगादी मार्ग असे नामकरण करण्यात आले. सदर रस्त्याच्या दुतर्फा वड, आंबा, पिंपळ, बेल असे विविध देशी वृक्षांचे वृक्षारोपन यावेळी करण्यात आले.
Trimbakeshwar Sinhastha Kumbhamela Shahisnan dates declared