त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेले तीन दिवस सतत पडत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. तर, मध्यरात्री पावसाने दीड वाजता जोर पकडल्याने शहरात पूरस्थिती निर्माण झाली. मेनरोड व तेली गल्ली भागातील नागरीकांच्या घरात व दुकानात पाणी शिरले. त्यामुळे ऐन मध्यरात्री परिसरातील नागरिकांना धावपळ करावी लागली.
रात्री पासुन आज सकाळ पर्यंत १८२ मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. पुर्वी गंगाद्वार पर्वतावर मध्य व तळाशी निवृत्तीनाथ पटांगणात पाऊस मोजणी यंत्र होते. त्यामुळे गावात पडलेल्या पावसाचा अंदाज यायचा. सध्या गावापासून एक कि.मी. दुर त्रंबकेश्वर विश्राम गृह, वेळुंजे व हरसुल अशा ३ ठिकाणचा पाऊस मोजूनही निश्चित आकडेवारी ठरत नाही व मिळतही नाही.
दिवसभरात त्र्यंबकेश्वर येथे १८२ मि.मि., वेळुंजे येथे १५७ मि.मि. तर हरसुल येथे १४३ मि.मि. अशी एकुण ४८२ मि.मि. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी व वाड्या पाड्यांचा असुन पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. या भागात दळणवळण व वाहतुक सोयींची अनास्था आहे. अशातच काही प्रसंग निर्माण झाल्यास कोणत्याही स्वरूपात व्यवस्था निर्माण होउ शकत नाही. या बाबतीत सर्वच उदासीन असुन घटना घडल्यावर धावपळ करण्यासाठी प्रयत्न करणारे आहेत.
सलग च्या पावसाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री ( त्र्यं ), कचरपाडा, गारमाळ, ठाणापाडा, कळमुस्ते (ह), या ठिकाणी घरांचे अंशत: नुकसान झाले असुन प्रशासनातर्फे पंचनामा करण्यात आला आहे. तालुक्यातील धायटीपाडा येथे कृष्णा लक्ष्मण गभाले, वय ४५ वर्षे यांचा दि. १० रोजी पाय घसरुन नाल्यात पडल्याने मृत्यु झाला. हरसुल जवळील शिरसगाव ते मुरंबी दरम्यान तयार होत असलेला पुल तुटला असुन दि. ८ रोजी पुलाचे साहित्य वाहुन गेले आहे.
शिरसगाव (हरसुल) येथे हेमंत काशिनाथ महाले यांच्या पोल्र्टी फार्म चे अंशत: नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे भात खाचरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने भाताची आवणी खोळंबली असल्याचे शेतकरी काळु उजे यांनी सांगितले. ठिकठिकाणी पुलांवरून पाणी वहात असुन दळणवळणास अडचणी येत आहेत. गोदावरीची उपनदी किकवी जोरदार वहात असुन तीच्या काठावरील गावात पाणी आहे. पिंपळद गावच्या किकवी नदीच्या पुलावरून पाणी गेल्याने ब्राम्हणवाडे, माळेगांव या गावांचा संपर्क तुटला आहे.
तसेच पुलावरून पाणी गेल्याने नदीच्या पलीकडे राहणाऱ्या पिंपळद गावातील ग्रामस्थांचा देखील गावाशी संपर्क तुटला असून गावची स्मशानभूमी देखील पाण्याखाली गेली आहे. त्र्यंबकेश्वर शहरातील तेली गल्ली व मेन रोड परिसरात रात्री दिड वाजता व पहाटे सहा वाजता पुर आल्याने लोकांच्या दुकानात व घरात मध्यरात्री पाणी शिरले. परिसरातील नागरीकांना दरवर्षीचा अनुभव असल्याने फारसे काही नुकसान झाले नाही मात्र नागरीकांची झोपमोड झाली. संततधार पावसामुळे ब्रह्मगिरी, अंजंनेरी पर्वतावरून असंख्य धबधबे खाली कोसळत असल्याचे दृष्य अनेकांनी आपल्या मोबाईल, कॅमेऱ्यामध्ये साठवुन ठेवले.
Trimbakeshwar rainfall villeges lost contact city roads in water