त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तब्बल दीड महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद झाला आहे. पिंपळद परिसरात वनविभागाने पिंजरा लावला होता. त्यात अखेर हा बिबट्या अढकला आहे. दरम्यान, या परिसरात आणखी दोन बिबट्यांचा वावर असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे.
दीड महिन्यापूर्वी पिंपळद येथे बिबट्याच्या हल्ल्यात देविका भाऊसाहेब सकाळे (वय ७ वर्ष) ही ठार झाली होती. देविका ही मोठ्या बहिणीसोबत (दि.६ एप्रिल रोजी) पाच वाजेच्या सुमारास पिंपळद गावातून दळणाचा डब्बा घेऊन आपल्या घरी सकाळे मळ्यात जात होती. त्याचवेळी घरात शिरण्यापूर्वीच मळ्याच्या झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने देविकावर हल्ला केला. या हल्ल्यात देविका गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच, या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती.
याठिकाणी वनविभागाने तात्काळ बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी १० हून अधिक पिंजरे लावले होते. अखेर आज एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. दरम्यान, यावेळी गावातील युवकांसह आजुबाजुच्या मळ्यातील रहिवाशांनी बिबट्याला बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. तसेच याठिकाणी अजून दोन बिबटे असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली असून त्यांना पकडण्यासाठी ग्रामस्थांसह वनविभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
Trimbakeshwar Pimplad Leopard Arrest