रविंद्र धारणे, त्र्यंबकेश्वर
धन्य धन्य निवृत्ती नाथा !
काय महिमा वर्णावा !
शिवें अवतार धरुन ।
केले त्रैलोक्य पावन।
समाधी त्र्यंबक शिखरीं ।
मागे शोभे ब्रह्मगिरी ।
निवृत्तीनाथांचे चरणी ।
शरण एका जनार्दनी ।।
वारकरी धर्माचे आद्य प्रवर्तक, ज्ञानोबा माऊलींचे जेष्ठ बंधु तथा गुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या भेटीसाठी राज्यातुनच नव्हे तर राज्या बाहेरुनही शेकडो पायी दिंड्यासह हजारो भाविक आज श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले आहेत. दोन वर्षे कोरोनाच्या कालखंडानंतर यावर्षी भाविकांनी अभुतपुर्व गर्दी केली आहे.
त्र्यंबकेश्वर कडे येणारे तिनही बाजुंचे रस्ते भाविकांच्या गर्दीने ओसंडुन वाहत आहेत. नगरीमध्ये दाखल होत असलेल्या दिंड्यांचे स्वागत नगरीच्या प्रवेशद्वारी श्रीसंत गजानन महाराज संस्थान व नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले. मंगळवारी सायंकाळ पर्यंत जवळपास लहानमोठ्या सहाशेहुन अधिक दिंड्यांची नोंद करण्यात आली. भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेउन, कुशावर्ताला वंदन करुन दिंड्या निवृत्तीनाथ मंदिराकडे जात होत्या. निवृत्तीनाथ महाराज संस्थान तर्फे प्रत्येक दिंडीचे स्वागत केले. नाथांचे दर्शन घेउन दिंड्या आपापल्या ठरलेल्या ठिकाणी विसावल्या. किर्तन अभंगाचे सुर, टाळमृदुंगाचा गजर आणी हरिनामाच्या जयघोषामुळे संपुर्ण परिसर भक्तीमय झाला आहे.ॉ
गावात वाहनांना प्रवेश बंदी
– भाविकांची गर्दी पहाता अत्यावश्यक वाहने वगळता खाजगी वाहनांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. नाशिक कडून येणार्या भाविकांनी आपली वाहने श्रीचंद्र लाॅन्स चे बाजूला व त्याचे विरुद्ध गॅस गोडाऊन कडे वाहने पार्क करावीत.
– जव्हार रोडने येणारे वाहने हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजूला पार्किंग मध्ये पार्क करावीत तसेच स्वामी समर्थ कडून येणारे वाहने कचरा डेपो जवळ पार्किंग मध्ये करावीत. असे आवाहन पो.नि. संदीप रणदिवे यांनी केले आहे. ही सर्व पार्किंग पे अॅण्ड पार्किंग धर्तीवर आहेत.
उद्या पहाटे महापुजा
यात्रेच्या निमित्ताने एकादशीचे दिवशी मध्यरात्री बारा वाजता संस्थानच्या वतीने श्री निवृत्तीनाथ महाराज संजिवन समाधीची महापुजा संपन्न होईल. तर पहाटे चार वाजता शासकीय महापुजा संपन्न होईल. महापुजेकरीता पालकमंत्री ना. दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे व आमदार हिरामण खोसकर यांना आमंत्रण देण्यात आले आहे.
रिंगण सोहळा संपन्न
ह.भ.प. कृष्णाजी माऊली जायखेडकर दिंडीचा अभुतपुर्व गोल रिंगण सोहळा सालाबादप्रमाणे ब्रह्मा व्हॅली कॅम्पस मध्ये संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये वारकर्यां बरोबरच विद्यार्थी, महिलावर्ग याचबरोबर वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनीही धाव घेतली. माऊलींचा अश्वाने देखील गोल रिंगण धावले.
रथ मिरवणूक सोहळा
यात्रेचे औचित्य साधुन श्री निवृत्तीनाथांचा रथ मिरवणूक सोहळा पारंपारिक पध्दतीने संपन्न करण्यात येईल. दुपारी ठीक ४ वाजता श्री निवृत्तीनाथांची चांदीची प्रतिमा पानाफुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान करुन पालखी चांदीच्या रथात ठेवण्यात येईल. बॅडपथक, झेण्डेकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, विणेकरी, टाळकरी, पखवाज वादक, संस्थांनचे विश्वस्त, दिंड्यांचे मानकरी, नामवंत किर्तनकार, त्यामागे नाथांचा रथ, रथामागे हजारो भाविक, असा सर्व लवाजमा अल्पबचत भवन, चौकीमाथा, सुंदराबाई मठ, तेली गल्ली, पाटील गल्ली, पोस्ट गल्ली मार्गे श्री त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात पोहचेल. मंदिरात शिवस्वरूप निवृत्तीनाथ आणि भगवान त्र्यंबकेश्व्रराची भेट घडविण्यात येउन नाथांची मूर्ती काही वेळ पिंडीवर विराजमान ठेवण्यात येईल. यानंतर रथ परतीच्या प्रवासाला निघुन लक्ष्मीनारायण चौक, मेनरोड मार्गे तीर्थराज कुशावर्तावर आणण्यात येईल. तेथे पवित्र गोदामाईला वंदन करून निवृत्तीनाथ मंदिरात नेण्यात येईल.
Trimbakeshwar Nivruttinath Yatra Ringan Sohala