रविंद्र धारणे, त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर येथील वारकरी सांप्रदायाचे आद्य प्रवर्तक संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेसाठी जवळपास तीन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी येथे हजेरी लावली. हरिनामाच्या जयघोषाने आणि टाळ मृदुंगाच्या गजराने अवघी त्र्यंबक नगरी दुमदुमून गेली.
दृष्टी पडता ब्रह्मगिरी
तयासी नाही यमपुरी
करिता कुशावर्ती स्नान
त्याचे कैलासी रहाण
नामा म्हणे प्रदक्षिणा
त्याचे पुण्या नाही गणना
असे या क्षेत्राचे महात्म्य संत नामदेवांनी आपल्या अभंगातून सांगितले आहे. त्याचे अनुकरण करीत कड्याक्याच्या थंडीची पर्वा न करता मंगळवार पहाटे पासुनच हजारो भाविकांनी पवित्र कुशावर्तात स्नान करून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचा मार्ग धरला. सायंकाळ नंतर तर या मार्गावर गर्दीचा उच्चांक होता. हा ओघ बुधवार दुपार पर्यंत सुरूच होता. जवळपास एक ते दीड लाख भाविकांनी प्रदक्षिणा टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंग गात प्रदक्षिणा पुर्ण केली.
धार्मिक प्रदक्षिणा कशी असावी? असे या प्रदक्षिणेकडे बघता येईल. श्रावणातील तिसर्या सोमवारी प्रदक्षिणेच्या नावाखाली धुडगुस घालणार्या टवाळखोरांनी दरवर्षी अशा भाविकांसोबत प्रदक्षिणा करावी म्हणजे तिचे महत्व अबाधित राहील. बुधवारी म्हणजे एकादशीच्या दिवशी सकाळी कुशावर्तावर स्नानासाठी भाविकांनी कुंभमेळा पर्वणी सारखी प्रचंड गर्दी केली होती. तसेच हजारो भाविकांनी ब्रह्मगिरी पर्वतावर जाऊन देवदर्शन केले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापुजा
एकादशीच्या दिवशी मध्यरात्री १२ वाजता निवृत्तीनाथ मंदिर संस्थानच्या वतीन संस्थानचे वतीने नाथांच्या संजीवन समाधीची पुजा केली. यानंतर नगर पालिकेच्या वतीने शासकीय महापुजा आयोजित केली जाते. यावर्षी पालकमंत्री ना. दादा भुसे यांनी सपत्निक समाधीची पुजा केली. ना. दादा भुसे यांचे दोन्ही पुत्र अविष्कार व अजिंक्य समवेत होते. आमदार हिरामण खोसकर, भाजपचे जेष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांनीही पुजेमध्ये सहभाग नोंदवला. पुजेचे पौरोहित्य मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी तथा विश्वस्त ह.भ.प. जयंत महाराज गोसावी, योगेश महाराज गोसावी, सच्चिदानंद गोसावी यांनी केले. यानंतर प्रथम दर्शनार्थी म्हणुन वैजापूर तालुक्यातील मनोळे येथील वारकरी विलास माधवराव सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी मीराबाई यांना मान मिळाला. ना. भुसे यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर मंदिराचे सभामंडपात प्रमुख अतिथींच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी माजी जि.प. अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, जिल्हा नियोजन अधिकारी शाम गोसावी, बाळासाहेबांची शिवसेनेचे शहराध्यक्ष सुरेशतात्या गंगापुत्र, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त भुषण अडसरे, काॅंग्रेसचे तालुकाध्यश संपतराव सकाळे, समाधान बोडके, किरण चौधरी, निवृत्तीनाथ मंदिर संस्थानचे अध्यक्ष निलेश गाढवे, सर्व विश्वस्त, ह.भ.प. तुळशीदास महाराज गुट्टे, नगर षरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय जाधव, आदि मान्यवर उपस्थित होते. नगर परिषद व संस्थानच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक ह.भ.प. माधवदास राठी तर सुत्रसंचलन सुरेशतात्या गंगापुत्र यांनी केले. सत्काराला उत्तर देतांना ना. भुसे यांनी राज्यातील शेतकरी, कष्टकरी समाज, समाजातील सर्व घटक आणी राज्याच्या प्रगतीसाठी नाथांना साकडे घातले. २०२७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे संपन्न होणार्या कुंभमेळ्याचा आराखडा तयार करण्याचे काम मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सुरु केले आहे. त्र्यंबकेश्वरच्या विकासाचा आराखडा तयार करतांना आचारसंहिता संपल्यावर येथेच बैठक घेऊ, आपण केलेल्या सुचनांचा मी स्वत: पाठपुरावा करील असे सांगितले.
रथ मिरवणूक सोहळा
यात्रेच औचित्य साधुन श्री निवृत्तीनाथांचा रथ मिरवणूक सोहळा पारंपारिक पध्दतीने संपन्न करण्यात आला. दुपारी ठीक ४ वाजता श्री निवृत्तीनाथांची चांदीची प्रतिमा पानाफुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान करण्यात आली. पालखी मंदिरातून बाहेर आणून चांदीच्या रथात ठेवण्यात आली. रथ पानाफुलांनी सजवुन त्यावर नेत्रदिपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रथाला बैलजोडी जोडून रथाची पुजा करण्यात आली. ठिक ४.३० वाजता रथ मंदिरासमोरून हालला. सर्वात पुढे बॅडपथक, नंतर झेण्डेकरी, त्यामागे डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, विणेकरी, टाळकरी, पखवाज वादक, संस्थांनचे विश्वस्त, दिंड्यांचे मानकरी, नामवंत किर्तनकार, त्यामागे नाथांचा रथ, रथामागे हजारो भाविक, असा सर्व लवाजमा निघाला.
रथ अल्पबचत भवन, चौकीमाथा, सुंदराबाई मठ, तेली गल्ली, पाटील गल्ली, पोस्ट गल्ली मार्गे श्री त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात पोहचला. रथ मार्गावर ठिकठिकाणी सुवाशिनींनी नाथांच्या प्रतिमेच औक्षण केले. मंदिरात शिवस्वरूप निवृत्तीनाथ आणि भगवान त्र्यंबकेश्वराची भेट घडविण्यात आली. नाथांची मूर्ती काही वेळ पिंडीवर विराजमान करण्यात आली. मंदिराच्या प्रांगणात बराचवेळ अभंग गायन करण्यात आले. ड्युटीवरील तणावातुन मुक्त होत महिला पोलीस अधिकार्यानीही फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. यानंतर रथ परतीच्या प्रवासाला निघाला. रथ लक्ष्मीनारायण चौक, मेनरोड मार्गे तीर्थराज कुशावर्तावर आणण्यात आला. तेथे पवित्र गोदामाईला वंदन करून देशमुख चौक मार्गे निवृत्तीनाथ मंदिरात नेण्यात आला. त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. रथ मार्गावर ठिकठिकाणी नाथांच्या रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
Trimbakeshwar Nivruttinath Yatra Celebration