रविंद्र धारणे, त्र्यंबकेश्वर
धन्य धन्य निवृतीनाथा ,
काय माहिमा वर्णवा ,
असे अभंग मुखी गात, हातात वारकरी सांप्रदायाच्या पताका, महिलांनी डोक्यावर तुलसीपात्र, विणेकरी, टाळकरी, मानाच्या दिंडयासह हजारों वारकऱ्यांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा जयजयकार करीत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्रीक्षेत्र पंढरपुर च्या दिशेने प्रस्थान केले.
शेकडो वर्षांची पंरापंरा असलेल्या आषाढी वारी साठी संतश्रेष्ट निवृतीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यासाठी कालपासुनच मानाच्या दिंडयासोबत हजारों च्या संख्येने वारकरी भाविक त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाले होते. सकाळी निवृतीनाथांच्या मंदीरात संतश्रेष्ठ निवृतीनाथांची विधिवत पुजा करण्यात आली. यानंतर संस्थानच्या वतीने मानाच्या दिंड्यांचे प्रमुख यांना नारळ व कपाळी बुक्का लावून सत्कार करण्यात आला.
यानंतर “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल चा गजर करीत पायी दिंडया सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. पानाफुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथामध्ये संतश्रेष्ट निवृतीनाथांची मुर्ती व पादुका ठेवण्यात आल्या होत्या, रथास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. रथाच्या पुढे बैलगाडीमध्ये नगारा ठेवण्यात आला होता. रथाच्या पुढे मानाच्या संत निवृतीनाथ समाधी संस्थान, श्री विठ्ठल मंदीर गावठा दिंङी, सिन्नर, ह.भ.प. श्री. एकनाथ महाराज गोळेसर दिंडी, कुंदेवाडी, सिन्नर . ह.भ.प. मोहन महाराज बेलापुरकर दिंडी, पंढरपुर या ४ दिंडया होत्या तर रथाच्या मागे मानाच्या ३५ दिंड्या अतिशय शिस्तबद्ध रित्या सहभागी झाल्या होत्या. दुपारी तिन वाजता नाथांच्या मंदिरासमोरुन पालखी प्रस्थान झाले.
नुकताच नगर परिषदेच्या मुख्याधिकारी म्हणुन पदभार स्विकारलेल्या डाॅ. श्रीया देवचके यांनी त्यांच्या पतीसह संतश्रेष्ट निवृत्तीनाथांच्या मुर्तीस कुशावर्त तिर्थावर स्नान घालुन पुजा अभिषेक करण्यात आला. यावेळी विश्वस्त तथा पुजारी ह.भ.प. जयंत महाराज गोसावी, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, संस्थानचे अध्यक्ष निलेश गाढवे, विश्वस्त नारायण मुठाळ, श्रीपाद कुलकर्णी, मनोज कुमार राठी, राहुल साळुंके, अमर ठोंबरे, कांचन जगताप उकार्डे, गोकुळ गांगुर्डे, सोमनाथ घोटेकर, सच्चिदानंद गोसावी, महामण्डलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, ह.भ.प. माधवदास राठी, ह.भ.प. योगेश महाराज गोसावी, व्यवस्थापक गंगाराम झोले, संदीप मुळाणे, विष्णु बदादे, दादा आचारी आदी उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष सुनिल अडसरे यांच्या बैलजोडीला सातपुर पर्यंत जोडण्याचा मान मिळाला तर सातपुर ते पंढरपुर पर्यंत घोटी येथील निलेश आंबेकर यांची बैलजोडी रथाचे सारथ्य करणार आहे. यानंतर पालखीने त्र्यंबकेश्वर मंदिरच्या दिशेने कुच केली यावेळी मंदीरात भगवान त्र्यंबकराज व संतश्रेष्ट निवृत्ती महाराजांची भेट घडविण्यात आली. मंदिरासमोर अभंग गायन करण्यात आले. रथाच्या पुढे मोठ्या संख्येने अश्व सहभागी झाले होते. एका अश्वाच्या पाठीवर एक बाजुने भोलेनाथाचे तर दुसर्या बाजुने विठ्ठलाचे चित्र रंगविण्यात आले होते.
पहिल्याच दिवशी पालखीचा थेट सातपुरपर्यंतचा पायी प्रवास सर्वांनाच अवघड होतो म्हणून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थानने यावर्षी पालखीचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वर शहरालगतच्या व संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे गुरु श्री गहिनीनाथ महाराजांचे समाधी स्थानावर म्हणजेच प्रयागतीर्था समोरील श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्यात मुक्काम करणार आहे. वाजत गाजत या ठिकाणापर्यंत त्र्यंबककरांनी पायी दिंडीस निरोप दिला. पंढरपुर वारीच्या इतिहासात त्र्यंबकेश्वर जवळच असल्याने त्र्यंबकवासीय व पंचक्रोशीतील रहिवाशांच्या सहकार्यातुन वारकर्यांसाठी मंडप, भोजन आदी सर्व व्यवस्था उत्तम करण्यात आली होती. महाराजा युवक मंडळाच्या वतीने याठिकाणी नाथांच्या स्वागतासाठी फुलांचा गालीचा तयार करण्यात आला होता. त्यावरुन नाथांची पालखी नेण्यात आली.
त्र्यंबकेश्वरची पालखी ही २७ दिवसांत पंंढरपूरला पोहोचणार आहे. दिंडीच्या पायी वाटचालीत जी गावे येतात, त्यांना वारीचे वेळापत्रक पूर्वीच पाठविण्यात आले आहे. पंढरपूरात २९ जुनला संत निवृत्तीनाथांची पालखी पोहचेल. त्र्यंंबकेश्वर ते पंढरपूर पायी अंतर जवळपास ४५० किलोमीटर आहे. पालखीला जाऊन-येऊन असा एकूण ४९ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
Trimbakeshwar Nivruttinath Palkhi