त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हरिनामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वारकरी पंथाचे आद्य प्रवर्तक श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी व गर्भगृहातील अन्य देवतांच्या मुर्तींना सुगंधी चंदनाची उटी लावण्यात आली यावेळी शेकडो वारकरी भक्ती रसात तल्लीन झाले होते.
भुतलावरील सजीव सृष्टी प्रमाणे देवालाही वैशाखाचा दाह सुसह्य व्हावा या भक्तीभावनेतून चैत्र वद्य एकादशीला श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी व मंदिराच्या गर्भगृहातील विठ्ठलरुक्मीणी आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या मुर्तीना चंदनाच्या उटीचे पारंपारीक पध्दतीने लेपन करण्यात येते. सुमारे दिडशे वर्षांपुर्वी एका वारकरी महिलेने हि परंपरा सुरू केली. ती आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे देवांना उटी लावली गेली. मात्र दोन वर्षे मंदिर बंद होते. प्रशासनाने यात्रा रद्द केली होती. त्यामुळे भाविकांना दर्शनाला मुकावे लागले होते. उटीचा प्रसादही घेता आला नव्हता. मात्र यावर्षी सर्व निर्बंध हटविल्याने हा नयनरम्य सोहळा वारकर्यांना याची देही याची डोळा बघता आला. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साह होता.
सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत गेले ७ दिवस अनेक महिलांनी ओवी अभंग गात दगडाच्या सहाणीवर चंदन घासुन उटी तयार केली. नाथांच्या समाधीची पंचोपचारे पुजा व अभिषेक संपन्न झाल्यावर दुपारी ठिक २ वाजता टाळ मृदुंगाच्या साथीने अभंग गात संजीवन समाधी व इतर देवतांना उटी लावण्यास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी संस्थान प्रशासकीय समितीचे पदाधिकारी ह.भ.प. अॅड. भाऊसाहेब गंभीरे, ह.भ.प. जयंत महाराज गोसावी, योगेश गोसावी, बंडातात्या कर्हाडकर, महामण्डलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, ह.भ.प. सुरेश महाराज गोसावी, भानुदास महाराज गोसावी , गोविंद महाराज गोसावी, सच्चिदानंद गोसावी, अॅड. विजय धारणे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हरिनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणुन गेला. यानंतर देवांना नवीन पोशाख करून साजशृंगार करण्यात आला. नाथांना मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवुन आरती करण्यात आली. नाथांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास पन्नास हजारांच्यावर भाविकांनी येथे हजेरी लावली. रात्री ११ वाजता समाधीची विधिवत पुजा करुन देवतांना लावलेली उटी उतरविण्यात येईल . ती टिपांमध्ये कालवुन भाविकांना प्रसादरूपी वाटण्यात येईल.
भाविक ती उटी घेऊन कृतार्थ मनाने घरी परततील . या वारीसाठी अनेक दिंड्या त्र्यंबकमध्ये दाखल झाल्या असुन ठिकठिकाणांहून किर्तनाचे सुर कानावर पडत आहे, तर शेकडो भाविकांनी आज ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पुर्ण केली. यानिमित्त नाथांच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पो .उप अधिक्षक कविता फडतरे यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. संदिप रणदिवे, स.पो.नि. अश्विनी टिळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता .