त्र्यंबकेश्वर – टाळमृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष वेदमंत्रांच्या उच्चारात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आज येथील श्रीनिवृत्तीनाथ मंदिरात भक्तीपूर्ण वातावरणात आणी मोठ्या उत्साहात पसायदान आणी गुरुस्तवन या सुवर्णपटांची प्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी हरिनामाच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. भागवत धर्माचे आद्य प्रवर्तक तथा लाखो भागवत भक्तांचे श्रध्दास्थान असलेले सदगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला असून सुवर्ण कलशारोहण सोहळा १४ मे पासून सुरू झाला आहे. दिनांक २२ मे रोजी वैशाख कृष्ण सप्तमीला सुमुहूर्तावर वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सुवर्ण कलशारोहण सोहळा हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने होणार आहे. १४ मे पासून यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सुरु झाला आहे. वैकुंठवासी ह.भ.प. गंगाधर महाराज डावरे दिंडी समाज ट्रस्ट तर्फे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने दररोज कीर्तन प्रवचन असे कार्यक्रम होणार आहे. १५ व १६ मे रोजी सुवर्णपट प्रतिष्ठापना सोहळा संपन्न करण्यात आला. श्रीमद् नरसिंह सरस्वती महाराज मूळपीठ देवस्थान आळंदी यांच्यातर्फे हा कार्यक्रम होणार आहे. आळंदी येथील भागवताचार्य प.पू.चक्रांकित महाराज यांच्या संकल्पनेतून हा सोहळा संपन्न झाला.
दिमाखदार मिरवणुक सोहळा
कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला मंदिराचा सुवर्ण कलश, सुवर्णाचा मुलामा दिलेला ध्वज व दोन्ही सुवर्णपट यांची पेशवाई थाटाची मिरवणूक काढण्यात आली. श्रीनिवृत्तीनाथ मंदिरापासून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. सर्वात पुढे सनई चौघडा, त्यामागे पारंपारीक पेहरावात अश्वारुढ झालेले युवक युवती, धर्मध्वजा धारक, डोक्यावर कलश घेतलेल्या महिला, पानाफुलांनी सजवलेल्या पहिल्या बग्गीमध्ये विराजमान झालेले प.पु. चक्रांकीत महाराज व वेदोनारायण गणेशशास्त्री द्रविड, पाठीमागील बग्गीत विराजमान झालेले महामण्डलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, महामण्डलेश्वर रघुनाथ महाराज तथा देवबाप्पा व ह.भ.प. सुरेश महाराज गोसावी, त्यामागे फुगड्या खेळणार्या महिला, वाजंत्री पथक, श्री निवृत्तीनाथ महाराजांचा चांदीच्या रथात विराजमान करण्यात आलेला सुवर्ण कलश, ध्वज व सुवर्णपट, त्यामागे गुलालवाडी ढोलपथक, त्यामागे ट्रॅक्टरवर विराजमान करण्यात आलेली त्र्यंबकेश्वरचा राजाची भव्य गणेश मुर्ती, त्या पाठोपाठ पाच ट्रॅक्टरवर सादर करण्यात आलेले त्या काळातील जिवंत देखावे असा भव्य लवाजमा होता. पेशवाई थाटाच्या विद्युत रोषणाई केलेल्या आकर्षक छत्र्या मिरवणुकीचे आकर्षण ठरल्या. श्रीनिवृत्तीनाथ मंदिर, अल्पबचत भवन, चौकी माथा, तेली गल्ली, पोस्ट गल्ली मार्गे मिरवणूक श्री त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ आणण्यात आली. सुवर्ण कलश व सुवर्ण पट मंदिराच्या गर्भगृहात नेऊन महादेवाच्या पिंडीला स्पर्श करुन आणण्यात आला. पुन्हा मिरवणूक मेनरोड मार्गे कुशावर्त तिर्थाला वंदन करुन देशमुख चौक मार्गे श्रीनिवृत्तीनाथ मंदिरात नेण्यात आली. नगर परिषदे मार्फत मिरवणूक मार्ग स्वच्छ करुन दुतर्फा जंतुनाशक पावडर टाकण्यात आली होती. तर नागरीकांनी घरासमोर सडा टाकुन आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. ठिकठिकाणी सुवाशिनींनी सुवर्ण कलश व सुवर्णपटाला औक्षण केले. जवळपास एक कि.मि. लांबीचा हा मिरवणूक सोहळा होता.
पसायदान व गुरुस्तवन सुवर्ण पटांची प्रतिष्ठापना
सोमवार १६ रोजी सायंकाळी प्रतिष्ठापना कार्यक्रमास प्रारंभ झाला. श्रीनिवृत्तीनाथ मंदिरासमोर भव्य मंडप टाकण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी श्री गोविंद गिरी महाराज कोषाध्यक्ष, श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या हे होते तर प.पु. चक्रांकीत महाराज, वेदोनारायण गणेश्वरशास्त्री द्रविड, संत नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदास, पंढरपूर, संत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी, पैठण, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, महामण्डलेश्वर महंत रघुनाथ महाराज देवबाप्पा, महामण्डलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर , ह.भ.प. सुरेश महाराज गोसावी, श्रीपंचायती आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते वेदमंत्राच्या जयघोषात आणी भक्तीपूर्ण वातावरणात श्रीनिवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या गर्भगृहात सुवर्णपटांची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा यथायोग्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक अवधुत महाराज चक्रांकीत यांनी प्रास्ताविक करतांना संतांचे वाङमय अतिशय पवित्र असून संतांचे जीवनही अनुपम्य आहे,समाधीच्या रूपाने संजीवन असणाऱ्या संतांच्या विचाराने भारलेला हा सोहळा आहे असे त्यांनी सांगितले.आज सातशे पंचवीस वर्षांनी संतांमध्ये आजही अनुपम्यता आहे असे ते म्हणाले.यावेळी पूज्य गणेश्वर शास्त्री यांनी आपल्या मनोगतात संत निवृत्तीनाथ ज्ञानदेवाचे गुरू गुरूंच्या आशीर्वादाने माऊलीने विश्व कल्याणार्थ पसायदान मागितले,निवृत्तीनाथ समाधी गर्भगृहात सुवर्णपट पसायदान, गुरुस्तवन अर्पण करणे हे अतिशय सुवर्णयोग आहे. यावेळी डॉ लहवीतकर यांनी ज्ञानेश्वर महाराज चक्रांकित महाराज यांनी दिलेले दोन सुवर्णपट पसायदान गुरुस्तवन निवृत्तीनाथांच्या मंदिरात प्रस्तापित होणे हे परमभाग्यच असे त्यांनी सांगितले, अखेरीस अध्यक्षीय भाषणात श्रीराम मंदिर जीर्णोद्धार समितीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी जगातला सर्वश्रेष्ठ वारकरी संप्रदाय, माऊली ज्ञानोबांचे गुरू निवृत्तीनाथांचे गुरुपीठ त्रंबकेश्वर आहे, माझ्या अंतःकरणातील स्थान त्रंबकेश्वर भगवान आहे. मी पूज्य चक्रांकित महाराजांचा ऋणी आहे त्यांनी बोलावलं अन दर्शनाचा योग् वैशाखी पौर्णिमेला घडवीला, खरं आजचा सुवर्णयोग आहे, त्यांची कल्पना माझ्यात उतरली, सोन्याच्या धातूंवर पसायदान गुरुस्तवन लावले यांनी भगवान निवृत्तीनाथांच्या चरणी कृतज्ञतेचे हे सुवर्णपट वाहिले. पसायदान ही विश्व कल्याणाची संकल्पना, ज्ञानेश्वरीचे सार पसायदानात आहे. यानिमित्ताने मला अनेक विद्वत्त मंडळींची यानिमित्ताने भेट झाली.हे माझे भाग्यच असे त्यांनी सांगितले. यावेळी जयंतमहाराज गोसावी, योगेश महाराज गोसावी, वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष हभप श्रावण महाराज अहिरे, सचिव लहू महाराज अहिरे, संत निवृत्तीनाथ पालखी सोहोळा माजी अध्यक्ष पुंडलीकराव थेटे, प्रफुल्ल, हेमंत उमेश , सुशील आदी कुलकर्णी बंधु, राजेंद्र ढेरगे यांचेसह वारकरी, कीर्तनकार, भाविक मोठया संख्यने उपस्थित होते. प्रमुख अतिथींचा परिचय व सुत्रसंचलन जगदीश जोशी यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.