त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील नुतन त्र्यंबक विद्यालया मधील १९७८ – ७९ साली दहावीच्या वर्गात असलेले वर्गमित्र मैत्रिणी थेट २०२३ साली म्हणजे तब्बल ४४ वर्षांनी प्रथमच एकत्र आले. गेल्या ४४ वर्षामध्ये अनेकांनी एकमेकांना बघितले सुध्दा नव्हते. अनेकांना एकमेकांचे चेहरे सुध्दा आठवत नव्हते. त्यामुळे या मेळाव्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते.
सर्व मित्रमंडळी १९७४ – ७५ साली इयत्ता पाचवी पासुन ते १९७९ साली दहावी पर्यंत एकत्र शिकत होते. त्यावेळी आजच्या सारखे मोकळे वातावरण नसल्याने विशेष म्हणजे मुलं मुली एकमेकांशी कधी बोललेही कुणाला आठवत नाही. दहावी सुटल्यानंतर प्रत्येकाच्या शैक्षणिक वाटा वेगवेगळ्या झाल्या. त्यानंतर जवळपास दहा वर्षे तरी कोणाकडे साधा लॅण्डलाईन फोन नव्हता. त्यावेळी फोन म्हणजे एक प्रतिष्ठेचे लक्षण होते. तर जवळपास २० – २२ वर्षे मोबाईल सुध्दा नव्हते. या कालावधीत कोणी नोकरी निमित्त बाहेरगावी गेले. प्रत्येकाच विवाह संपन्न होऊन जो तो आपापल्या करीयर मध्ये व संसारात रमला. मुलीही लग्न करुन सासरी गेल्या, त्यांची नावेही बदलली. त्यामुळे सिक्सटीन टु सिक्सटी स्नेहमेळाव्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते.
रविंद्र धारणे यांनी दहावी मित्रमैत्रिणींचा एक व्हाॅटस् अप ग्रुप तयार केला. आधी स्थानिक रहिवाशी मित्रमंडळी त्यात गोळा केले. नंतर एकमेकांकडे चौकशी करीत जवळपास ३८ वर्गमित्रांचा ग्रुप तयार झाला. गेल्या ४५ वर्षांमध्ये एकमेकांशी साधे बोलणेही न झाल्याने ग्रुपवर सहसा कोणी चॅटींग करीत नव्हते. धारणे यांनी चॅटीगसाठी वेगवेगळे विषय काढुन ग्रुप हलता ठेवला. आता प्रत्येकाला एकमेकांना भेटायची उत्सुकता असल्याने लवकरात लवकर सर्वांनी एकत्र जमण्याचे ठरवले. ग्रुप तयार झाल्यापासुन अवघ्या दोन महिन्याच्या आतच स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
त्र्यंबक जव्हार रोडवर सुधीर शिखरे यांच्या मळ्यात निसर्गरम्य ठिकाणी मेळावा घेण्यात आला. स्थानिक रहिवाशी, तत्कालीन मुख्याध्यापक तथा वर्गशिक्षक मधुकर कडलग सर, आर.व्ही. आहेर सर आदी शिक्षकवृंद व जेष्ठ नागरीक सुधीर शिखरे प्रमुख अतिथी लाभले. प्रमुख अतिथींच्या हस्ते व वेदमंत्राच्या जयघोषात सरस्वती पुजन, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचलन वर्गमित्र तथा बिर्ला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. बिपीन वाडेकर यांनी केले. जे चार पाच मित्रांनी अकाली या जगाचा निरोप घेतला त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित शिक्षकवृंद व सुधीर शिखरे यांचा यथायोग्य सत्कार करण्यात आला. यानंतर प्रत्येकाने आपल्या विषयी माहिती व मनोगत व्यक्त केले. शोलेय आठवणींना उजाळा देण्यात आला.
आपले मनोगत व्यक्त करतांना जेष्ठ नागरीक सुधीर शिखरे यांनी सांगितले की, आपल्या शालेय जिवनाच्या वेळी व्यापारी वर्ग सोडला तर सर्वांचीच परिस्थिती हलाखीची होती. आपण त्यावेळी कसे दिवस काढले? गुरुजनांप्रति आपल्याला किती आदर होता? याची जाणीव पुढच्या पिढीला करुन देण्यासाठी अशा कार्यक्रमाला सहकुटुंब उपस्थित राहीले पाहीजे. कडलग सर यांनी सांगितले की, इतर शाळेतील मुलांप्रमाणे आपल्या शाळेतील मुलांनी चांगले मार्क कमवावेत. मुलांनी सर्वांचे नाव मोठे करावे, यासाठी काही प्रसंगी शिक्षकाला कठोर भुमिका घ्यावी लागते, शिक्षा करावी लागते. त्यावेळी पालकांनी देखील समजुतदारपणा दाखवल्यामुळे आज तुम्ही जिवनात यशस्वी असल्याचे त्यांनी सांगितले. तर आर. व्ही. आहेर यांनी सांगितले की, ४४ वर्षानंतर तुम्ही आमची आठवण ठेवुन आम्हाला बोलावले, आम्हाला तुमच्या आनंदात सहभागी केले. हे खरे संस्कार आहेत. यावेळी कृतज्ञतेमुळे त्यांचे डोळे भरुन आले. यानंतर वर्गमित्र तथा सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गोडसे यांचा सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. एकमेकांशी गप्पागोष्टी करण्यात करण्यात दिवस कुणीकडे निघुन गेला, हे लक्षातच आले नाही. कोरोना काळात काही मित्रमैत्रीणींना आपल्या जिवनसाथीचा विरह सहन करावा लागला तर काहींनी दुर्धर आजारावर मात करीत कार्यक्रमाला हजेरी लावली, त्यांचेसाठी हा मेळावा मनाला उभारी देणारा ठरला. सरतेशेवटी एकमेकांच्या सुखदु:खाला धावुन जाण्याचे कबुल करीत तसेच वर्षातुन एकदा तरी सर्वांनी एकत्र येण्याचे निश्चीत करुन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
यांनी घेतला सहभाग…
रविंद्र धारणे, सुनिल शुक्ल, सुनिल ढेरगे, चंद्रकांत थेटे, उल्हास आराधी, मिलिंद ( नंदु ) शेळके, चंद्रशेखर काळे, भोलानाथ शेलार, कैलास कदम, गोकुळ कदम, अविनाश जगताप, अकील पठाण, चंद्रकांत गोडसे, अनिल कचोळे, बिपीन वाडेकर, मुकुंदा अकोलकर, बाळासाहेब कळमकर, विजय शिखरे, अरुण शिखरे, सुरेश ( बाळा ) गाजरे, शरद आहेर.
महिलावर्ग :-
अनिता शहा, अलका घैसास भावे, अंजली शिखरे, प्रतिभा देवकुटे कुलकर्णी, प्रतिभा रुईकर हुदलीकर, रंजना गायकवाड मोरे, रंजना थेटे कुलकर्णी, रंजना वडजे झाडे, रोहीणी शिखरे पाठक, सविता वाडेकर पंचाक्षरी, सुरेखा सोनी बुब, सुलभा भोसले दळवी तर प्रतिभा देवरे निकुंभ, रेखा देवरे दुसाने, सविता देवरे मोरे, कल्पना शुक्ल, या कार्यक्रमाला येउ न शकल्याने त्यांनी आॅनलाईन सहभाग नोंदवला.
Trimbakeshwar Friends Reunion 44 Years