त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या परिसरात दमदार पाऊस नसला तरी रिमझीम पाऊस सुरु आहे. त्यामुळे स्वर्गभुमिचीच आठवण व्हावी असे निसर्ग सौदर्य सर्वत्र खुलले आहे. त्र्यंबकेश्वर जवळ त्र्यंबक – घोटी रोडवरील पहिणे घाट,काचुर्ली परिसरातील दुगारवाडी धबधबा निसर्ग सौदर्यासाठी प्रसिध्द आहे. अंजंनेरी, ब्रह्मगिरी पर्वत शिखरां वरुन असंख्य धबधबे कोसळतात. त्यामुळे हे धबधबे सुरु झाले की असंख्य पर्यटकांची पावले आपोआप इकडे वळतात. शनिवार रविवार तर गर्दिचा उच्चांक असतो. अनेक पर्यटकांनी ठिकठिकाणी धबधब्याखाली भिजण्याचा तसेच नदीच्या पाण्यात बसण्याचा आनंद घेतात. दरम्यान दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांपैकी एक पर्यटक अमित शर्मा (वय १७) वाहून गेल्याची घटना घडली आहे.
१६ जुलै रोजी अनेक पर्यटक दुगारवाडी धबधबा तसेच आजूबाजूच्या परिसरातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येथे आले होते. दरम्यान काल दुपारी चार वाजेच्या सुमारास सह्याद्री नगर, लाॅरेन्स रोड, देवळाली कॅम्प येथील रहिवाशी अमित शर्मा हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती समजताच वनविभागासह पोलिस शोधमोहीम राबवत आहे. आज सकाळी पहाटे पाच वाजेपासून शोधमोहीम पुन्हा सुरू केली आहे. नदीला पाणी जास्त असल्याने शोधकार्यास अडथळा येत आहे.
दुगारवाडी धबधबा बघण्यासाठी जातांना पर्यटक टेकडी उतरून नदीपात्र ओलांडतात. बहुतेकांना हे माहीत नसते की, कळमुस्ते शिवारात पाऊस होतो, तेव्हा या धबधब्याचा जोर वाढतो. नदी प्रवाहात अचानक पाण्याची पातळ वाढते, प्रवाहाचा वेग वाढतो आणि तो ओलंडणे अशक्य होते. दुपारी आलेले पर्यटक सायंकाळपर्यंत धबधब्याजवळ पोहोचतात आणि परत फिरताना त्यांना अंधार होतो. गेल्या वर्षी १०० ते १५० पर्यटक असेच अडकून पडले होते. त्यातील काहींनी येण्याचा प्रयत्न केला. त्यात एक व्यक्ती वाहून गेली. अशा दुर्घटना दरवर्षी घडत आहेत व कालही अशीच घटना घडली. वनखाते ठिकठिकाणी फक्त शुल्क आकारते. त्यांनी कोणतेही सूचना फलक लावलेले नाहीत अथवा गार्ड ठेवलेले नाहीत. धोकादायक ठिकाणांची माहिती दिलेली नाही. पावसाचा जोर असताना धबधब्याकडे जाण्याचा प्रकार बंद करण्याची दक्षता घ्यायला हवी. इतर वेळी नदी प्रवाह ओलांडताना दोर, साखळी यासारखे रेलिंग आधाराला करण्याची गरज आहे. मात्र संयुक्त वनव्यवस्थापन समिती केवळ पैसे कमावण्यात धन्यता मानत आहे.