त्र्यंबकेश्वर – दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर यावर्षी पहिल्याच श्रावण सोमवारी आद्य ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. गेले दोन वर्षे कोरोनामुळे धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद होती. त्यामुळे गेले दोन वर्षे निर्बंधामुळे श्रावण महिन्यात भाविकांना त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात जाता आले नव्हते. मात्र यावर्षी निर्बंधमुक्तीमुळे श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली.
रविवारी रात्रीपासूनच तरूणाई ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला रवाना होत होती. तर पहाटे पाचपासून शेकडो भाविक अभंग गात, बम बम भोलेचा जयघोष करीत प्रदक्षिणेला जात होते. पहाटे पासुनच भगवान त्र्यंबकेश्र्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पुर्व दरवाजातुन धर्मदर्शन तर मंदिराच्या उत्तर दरवाजातुन पेड दर्शन व नेमुन दिलेल्या वेळेत स्थानिक नागरीकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते. देणगी दर्शनासाठीही मोठी रांग लागली होती. खाजगी वाहनांना गावात प्रवेशबंदी होती.
दुपारी ठिक तीन वाजता भगवान त्र्यंबकेश्वराच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पानाफुलांनी सजविलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला. बॅण्डच्या तालावर वाजतगाजत पालखी कुशावर्त तिर्थावर आणण्यात आली. या ठिकाणी एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पूजा अभिषेक करण्यात आला. वंशपरंपरागत पुजारी वेदमुर्ती नारायण फडके यांनी पूजाविधीपार पाडला तर शागिर्द म्हणुन सचिन दिघे, मंगेश दिघे, संजय दिघे, कुणाल लोहगावकर यांनी सेवा बजावली. आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली. या सोहळ्यात मंदिर संस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी, संतोष कदम, अॅड. पंकज भुतडा, भुषण अडसरे, तृप्ती धारणे, पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांचे सह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी, शेकडो भाविक सामील झाले होते. श्रावण सोमवार निमित्त कुशावर्त तिर्थावर स्नानासाठी भाविकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. जवळपास पन्नास हजार भाविकांनी आज येथे हजेरी लावली तर १० हजारापेक्षा जास्त भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पुर्ण केली .पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, यांचे मार्गदर्शनाखाली पो. उपअधिक्षक कविता फडतरे, पोलीस निरिक्षक संदीप रणदिवे, पो.ऊ.नि. अश्विनी टिळे व सहकार्यांनी यांनी मोठा बंदोबस्त लावला होता.