युवा चित्रकार सिद्धार्थ धारणे
त्र्यंबकेश्वर येथील सिध्दार्थ धारणे हा खरेतर संगणक अभियंता (कॉम्प्युटर इंजिनिअर). त्याने चित्रकलेचे कुठलेही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले नाही. मात्र आज त्याची सर्वत्र ओळख बनली ती म्हणजे एक नावाजलेला चित्रकार म्हणून. वडील रवींद्र धारणे एक नावाजलेले छायाचित्रकार व आई ज्योती या दोघांना कलेची नितांत आवड असल्याने त्यांनी आपल्या मुलाच्या या कलेला सुरुवातीपासूनच प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले. यामुळेच सिद्धार्थाच्या कलागुणांना वाव मिळाला. त्याच्या या यशोप्रवासाचा हा वेध…
सिद्धार्थला चित्रकलेची आवड लहानपणापासूनच होती. या प्रवासाची खरी सुरुवात झाली ती २००५ मध्ये. आदर्श इंग्लिश स्कूल मध्ये प्राथमिक शिक्षण घेत असतांना, जेव्हा त्याला अखिल भारतीय जल साहित्य संम्मेलनाच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक मिळाले. नंतर माध्यमिक शिक्षण सुरु असतांना एका नामांकित वृत्तपत्राच्या वतीने दरवर्षी आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय (महाराष्ट्र व गोवा) स्पर्धेमध्ये २००७ व २००८ असे सलग दोन वर्षे त्याला राज्यस्तरीय पारितोषिके मिळाली.
२००९ व २०१० सालात ब्रह्मा व्हॅली पॉलीटेक्निक मध्ये पदविकेचे शिक्षण सुरु असतांना एच.ए.एल व एरोनॉटीकल सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेत त्याला सलग दोन वर्षे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. महाराष्ट्र राज्य वनविभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत त्याला सलग पाच वर्षे पारितोषिक मिळाले आहे.
आजपर्यंत त्याला ३ राष्ट्रीय, ८ राज्य व १३ जिल्हास्तरीय परितोषिके मिळाली आहेत. विशेष बाब म्हणजे, आजपर्यंत त्यांनी ज्या ज्या स्पर्धेत सहभाग घेतला त्यामधून तो कधीही रिकाम्या हाताने परतलेला नाही. अशाच एका स्पर्धेतील गंम्मत तो सांगतो की “शाळेत असतांना जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित आपत्ती व्यवस्थापन स्पर्धेत मी भाग घेतला. स्पर्धेचे चित्र दिलेल्या वेळेत काढून झाल्यावर आयोजकांनी विचारले की सायंकाळच्या चित्र प्रदर्शनासाठी कोणाला अजून एखादे चित्र काढायचे आहे का? मी नवीन कागद घेऊन १२ ते १३ मिनिटात एक निसर्गचित्र काढून दिले. संध्याकाळी जेव्हा अधिकारी मंडळी परीक्षणासाठी आली तेव्हा त्यांना माझे ते चित्र खूप आवडले. त्यांनी विचारपूस केली असता त्यांना माझ्याबद्दल सांगण्यात आले. विशेष म्हणजे, एका लहान मुलाने एवढ्या कमी वेळात हे चित्र काढले? यावर त्यांचा विश्वास बसेना. जेव्हा निकालाची घोषणा झाली आणि मला प्रथम पारितोषिक मिळाले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या तत्कालीन महापौरांनी मला स्पर्धेच्या बक्षिसा व्यतिरिक्त खुश होऊन त्या दुसऱ्या चित्राबद्दल रोख ३००० रुपयांचे बक्षीस दिले.”
व्यावसायिक चित्रकार म्हणून त्याचा प्रवास सुरु झाला तो २०१४ मध्ये. नाशिक येथील सुला वाईनयार्ड येथे आयोजित एका व्यावसायिक चित्रप्रदर्शनात त्याने सहभाग घेतला आणि व्यावसायिक चित्रकारांच्या जगात पहिले पाउल ठेवले. आजपर्यंत सिध्दार्थने ९ व्यावसायिक चित्रप्रदर्शने केली आहेत. त्यापैकी ५ ही स्वतंत्र (सोलो एक्झीबिशन) तर ४ सामुहिक (ग्रुप एक्झीबिशन) होती.
अशीच एक आठवण सांगतांना तो म्हणतो, ‘द लॉस्ट रिवर’ हे १९५० सालचे त्र्यंबकेश्वर मेनरोड येथून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे चित्र. मध्यंतरी गोदावरी स्वच्छता आंदोलन जोरावर होते. प्रकरण हरिद लवादात पोहोचले होते. पूर्वी गोदावरीवर स्लॅब नसायचा. चित्रामध्ये ही अशीच नदी दाखवली आहे. त्यावेळी हे चित्र अनेक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आले. त्यानंतर एका प्रदर्शनात हे चित्र ठेवण्यात आले असता प्रदर्शन सुरु होताच दोन मिनिटांच्या आत एका नामांकित आर्किटेकने ते खरेदी केले.
चित्रकलेच्या विश्वातील यशाबद्दल त्याला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर येथील प्रतिष्ठित ‘गंगा गोदावरी’ पुरस्काराने त्यांना दोन वेळा सन्मानित करण्यात आले आहेत. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते सर्वात तरुण व्यक्ती आहेत. तसेच महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे २०१५ रोजी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने त्याला ‘त्र्यंबकेश्वर भूषण’ हा पुरस्कार देऊन गौरव केला. तसेच शु.य.मा. ब्राह्मण संस्थे तर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे तो सलग १५ वर्ष मानकरी ठरला आहे. याचप्रमाणे त्यांना अनेक खाजगी संस्थांनी पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला आहे. तसेच सिद्धार्थच्या चित्रांना अनेक वृत्तपत्रे, पुस्तके आणि दिनदर्शिकेंवरही मानाचे स्थान मिळाले आहे.
सिद्धार्थची स्वतःची एक वेगळी शैली आहे. त्यांच्या चित्रामध्ये आपल्याला पारंपारिक भारतीय आणि आधुनिक चित्रशैली असे दोघांचेही सुंदर मिश्रण पाहायला मिळते. निसर्ग, प्राणी, पक्षी, जनजीवन, सामाजिक, लोककला, व्यक्तिचित्र असे अनेक विषय तो रेखाटतो. तसेच वुड बर्न करुन पायरोग्राफ तयार करण्यातही त्याचे कौशल्य आहे.
आज त्र्यंबकेश्वर जवळ पेगलवाडी येथे राहत्या घरी त्याने आपला स्टुडिओ आणि आर्ट गॅलरी सुरु केली आहे. आज या कलेचा उपयोग त्याला इंटेरिअर डिझाईन मध्येही होत आहे. आजपर्यंत त्याने काढलेले पेंटींग्ज राज्यातच नव्हे तर राज्याबाहेर आणि परदेशातही पोहोचली आहेत. खाली दिलेल्या लिंकवर त्याची सर्व चित्रे बघता येतील