त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंग पिंडीवर बर्फाचे थर जमा झाल्याची बातमी सोशल मीडियातून झळकत आहे. पिंडीवर बर्फ जमा होणे ही नैसर्गिक बाब असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही बाब पूर्णतः नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटले आहे. वातावरणातील तापमानाची घट हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे..
यासंदर्भात अंनिसने म्हटले आहे की, सामान्यपणे गाभार्यातील तापमान आणि बाहेरचे तापमान यामध्ये १२ ते१३ अंशापर्यंत तफावत असते. साहजिकच गाभाऱ्यातील बाष्पयुक्त हवेला थंडावा मिळाल्याने आणि पिंडीचा भाग गुळगुळीत असल्याने तेथे बर्फाचे लहान लहान थर जमा होतात.रात्रीच्या वेळी तापमानात अधिक घट झालेली असते. त्यामुळे पहाटेच्या वेळी बर्फ तयार होण्याचे प्रमाण वाढते .
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यात कोणताही दैवी चमत्कार किंवा चांगले-वाईट घडण्याचे दैवी संकेत नाहीत. भाविकांनी आणि सामान्य नागरिकांनी अशा नैसर्गिक घटनांना चमत्कार समजू नये. मुळात चमत्कार कधीच घडत नसतात. एक तर अशा नैसर्गिक घटनांमागील कार्यकारणभाव समजून घेण्याची तसदी आपण घेत नाहीत आणि ज्यांना चमत्काराच्या माध्यमातून समाजात दैववाद पसरवायचा असतो आणि त्यातून स्वतःचे विशेषतः आर्थिक हितसंबंध वाढवायचे असतात, आर्थिक उखळपांढरे करून घ्यायचे असते तेच लोक अशा अफवा जाणिवपूर्वक पसरवत असतात. म्हणून लोकांनी अशा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये. तसेच संबंधित पोलीस प्रशासनानेही याची तातडीने दखल घेऊन, अफवा पसरविणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, असे अंनिसच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
https://twitter.com/BHARATGHANDAT2/status/1542763063216160769?s=20&t=dKs2TDPP2l5xIltQKYNE3g