नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सर्व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना कपडे धुण्यासाठी वॉशिग मशिन देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ते धडगांव तालुक्यातील त्रिशुल, काकरदा, मोजरा, तलई येथील शासकीय मुलींच्या वसतीगृह/आश्रमशाळांच्या नूतन इमारतीचे भुमीपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग (आदिवासी विकास) शाखा अभियंता एम.जी.मोरे,कनिष्ठ अभियंता एम.डी.पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटिया यांच्यासह स्थांनिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ.गावित म्हणाले की, राज्यातील आश्रमशाळेत प्रवेश घेणारे विद्यार्थी हे पहिल्या वर्गापासून प्रवेश घेतात शाळेत दाखल होतांना त्यांचे वय खुप कमी असल्याने अशा विद्यार्थ्यांना स्वत:चे गणवेश व कपडे धुवावे लागतात यासाठी राज्यातील सर्व आश्रमशाळेत येत्या काळात गणवेश व कपडे धुण्यासाठी वॉशिग मशीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशास इस्त्री करण्यासाठी मनुष्यबळाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येईल. प्रत्येक पालकांना वाटते की आपली मुले चांगल्या शाळेत शिकायला पाहिजे, चांगला गणवेश परिधान केला पाहिजे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व सोईसुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात नवीन आश्रमशाळाच्या बांधकामास सुरुवात केली. यावर्षी राज्यात 56 नवीन शाळांना बांधकामास मंजूरी देण्यात आली त्यात नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक 30 शाळांचा समावेश आहे. या नवीन इमारती अत्यंत चांगल्या बांधण्यात येत असून या इमारतीत ई-लायब्ररी, अत्याधुनिक लॅब, व्हर्चुअल क्लासरूम,अत्याधुनिक कॉम्पुटरची व्यवस्था , प्रयोगशाळांची सोय करण्यात येणार आहे. पुढील काळात इयत्ता आठवी पासून सर्व विद्यार्थ्यांना टॅब देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे बोलतांना म्हणाले की, राज्यातील सर्व आश्रमशाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदे भरण्यास मंजूरी देण्यात आली असून लवकरच ती पदे भरली जाणार असून उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी संपूर्ण राज्यात 500 व 250 विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह बांधण्यात येत आहेत. आदिवासी विकास विभागामार्फत दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून येत्या काळात आश्रमशाळा परिसरातच शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने देखील बांधण्यात येणार आहेत.
प्रत्येक आश्रमशाळेचा निकाल हा 100 टक्के लागावा यासाठी राज्यातील सर्व आश्रमशाळेत एकाच पद्धतीने अभ्यासक्रम शिकविले जाणार असून सर्व विद्यार्थ्यांची दोन तीन महिन्यांनी परीक्षा तसेच शिक्षकांच्याही परीक्षा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या विषयांत मुलांचा निकाल समाधानकारक लागणार नाही, अशा विषयांच्या शिक्षकांची वेतनवाढ रोखण्यात येतील. तर सातत्याने चांगले निकाल लागणाऱ्या शिक्षकांना वाढीव वेतनवाढ किंवा बक्षीस देण्यात येईल. राज्यातील सर्व आश्रमशाळेतील गणवेश, बुट व इतर शैक्षणिक साहित्यात एकसमानता राखण्यासाठी गणवेश ,बुट, आणि शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पुर्वीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जुलै महिन्यापासून खावटी कर्ज देणार असून दिवाळीपर्यंत अनुसूचित जमातीच्या नागरिकांना,रोजगारासाठी बकरी ,कोंबडी व बचत गटांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.