बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अघोरी प्रथांचे ‘चेटुक’ कोण उतरवणार..? सरकार, प्रशासन त्यासाठी काय करतंय? याची जबाबदारी कोणाची?

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 17, 2023 | 9:43 pm
in इतर
0
Anis

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
व्यथा आदिवासींच्या – भाग १९
अनिष्ट प्रथा – “अघोरी प्रथांचे ‘चेटुक’ कोण उतरवणार..?? ”

राज्यातील आदिवासी जमातींमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात अनिष्ट प्रथांचे पालन केल्याचे दिसून येते. यामागे नेमकी भीती आहे, परंपरांचा पगडा आहे, अभावग्रस्त जीवन आहे की भोंगोलिक वातावरण? अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होऊनही इतकी वर्षं झाली तरी परिस्थितीत बदल का नाही, याचं कारण शोधू या या लेखातून…

Pramod Gaikwad
श्री. प्रमोद गायकवाड
अध्यक्ष, सोशल नेटवर्किंग फोरम
आणि आदिवासी भागातील समस्यांचे अभ्यासक
मो. 9422769364

‘‘आजी, तुम्ही धडगावला कधी गेला होता?’’
‘‘तीस वरा ओई गयला, मी चारी नहा गई.’’ (पावरी भाषेत ती म्हणाली, सुमारे तीस वर्षं झाली. मी तिकडं गेले नाही.)
ही आजी धडगावात बाळंतपणानंतर गेली होती, बाळाला दवाखान्यात न्यायचं होतं आणि तिथं आई लागतेच, म्हणून ती गेली होती. त्यानंतर तिनं पाड्याच्या वेशीबाहेरही पाऊल टाकलेलं नाही. नंदूरबार जिल्ह्यातील नर्मदाकाठच्या आदिवासी पाड्यावरील या आजींसारखे अजून कितीतरी लोक तिथं असतील.

राज्याच्या सबनॅशनल सर्टिफिकेशनची टीम नंदूरबार जिल्ह्याच्या नर्मदेकाठच्या दुर्गम भागातल्या आदिवासी पाड्यांवर गेली होती. भरडगावात त्यांना या आजी भेटल्या. धडगावपासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या या पाड्यातल्या आजी आतापर्यंत आजारी पडल्यावर भगत किंवा बुवाबाबांकडं जातात, त्यांनी दिलेली जडीबुटी खातात, बरं वाटलं तर चांगलंच; पण नाही वाटलं, तर देवाचा कोप आहे, असं समजतात.

नंदुरबार परिसरातील आदिवासी ताप आल्यावर भगताकडे जातात. तसाही तीन दिवस ताप राहतोच. तिसऱ्या दिवशी बुवाकडे जातात. त्यांच्याकडची जडीबुटी घेतल्यावर बऱ्याच जणांचा ताप उतरतो. याची दोन कारणं आहेत, साधा ताप असेल तर तो दोन-तीन दिवसांत उतरतोच आणि तो भगतही रुग्णांना गोवऱ्यांच्या राखेत पॅरासिटॅमॉल मिसळून देतो. ताप उतरल्यावर रुग्णाला वाटतं, खूप चांगला बुवा आहे, त्यानंच आपल्याला बरं केलं.
… पण भोंदू बुवाकडे जायला लागणं हीच मोठी सामाजिक समस्या आहे. गावात वीज, पाणी, चांगल्या वैद्यकीय सुविधा, दळणवळणाच्या सुविधा नसतील तर लोक सहज उपलब्ध होणाऱ्या वैदूचीच पायरी चढतील. त्यांना नुसतं, ‘ही अंधश्रद्धा आहे, डॉक्टरकडे जा’ असं सांगणं सोपं असतं; पण त्यांना ते आचरणात आणणं फार अवघड असतं.

या परिसरात क्षयरोगाचं प्रमाण जास्त आहे, असं तिथं वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते सांगतात. इथले लोक क्षयरोगाच्या उपचारासाठीही भगत किंवा बुवाकडे जातात. अशानं रोग बळावण्याचीच शक्यता अधिक! अशावेळी भगत जी औषधं देतात, त्यातच क्षयरोग बरा करणारी औषधं पूड करून मिसळून द्यायला सांगण्यात आलं, जेणेकरून आजारावरचं नेमकं औषध रुग्णाच्या पोटात जाईल. भगतही तयार झाले; पण नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यातच सरकारनं नवीन नियम काढला की, त्या रूग्णाला डीओटी द्यावंच लागेल आणि त्यासाठी त्याचं आधार कार्डही सक्तीचं! या परिसरातील कितीतरी जणांकडं आधार कार्ड नाही. पण त्यांनी औषधं घेणंही बंद केलं, आता तिथं जैसे थे परिस्थिती आहे.

या अनिष्ट प्रथांना जबाबदार कोण? आदिवासी, भोंदू बाबा की सरकार?
ज्या भागात विजेची सोय नाही, पाण्याची सोय नाही, मोबाईल नेटवर्क नाही, तिथं कोण राहणार? अजूनही हे आदिवासी सोयीसुविधांविरहित हालाखीचं जीवन जगत आहेत. गेल्या दोन वर्षात नंदुरबार जिल्ह्यात ११प्रगत प्राथमिक आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. एक वर्ष उलटूनही बिलगाव केंद्रात अजूनही विजेसारख्या मूलभूत आरोग्य सुविधांचा अभाव आहे. तेथील वैद्यकीय अधिकारी बॅटरीच्या प्रकाशात रुग्णांवर उपचार करतात. या परिसरात मोबाईल नेटवर्क नाही आणि पाणीही नियमित येत नाही. अशा परिस्थितीत आधुनिक विज्ञानवाद रुजवून आदिवासींच्या जगण्यातील अनिष्ट प्रथा दूर करण्याकरता लागणाऱ्या वीज, पाणी या सुविधाही इथं नाहीत. नुसते सिमेंटचे सापळे उभे करून काय उपयोग?

डाकीण, चेटुक…
नंदुरबार, शहादा, धुळे, जळगाव, नाशिक, पालघरच्या आदिवासी भागात भूत, पिशाच्च, डाकीण यांचा मोठा पगडा आदिवासींच्या मनावर आहे. गोवरसारखा साथीचा आजार झाला असताना देवी आहे असा मनात अंदाज लावून या मुलांना नदीमध्ये जाऊन उतारा काढायला लावणं, त्यातून आजार बळावणं आणि प्रसंगी मूल दगावणं… म्हणजे अंधश्रद्धेला शब्दशः बळी पडणं… अक्कलकुवा, धडगाव परिसरात प्रसूत झालेल्या महिलेला वेदनाशामक म्हणून दारू पाजण्याची प्रथा आहे. अशावेळी या दारूचा परिणाम तिच्या बाळावरही होतो. तिला त्याचे नंतर व्यसनच लागतं, हे व्यसन अनिष्ट प्रथेमुळं लागतं. दवाखान्यात न जाता घरीच अघोरी उपचार करून बाळ दगावल्यावर, आपल्या घरात झालेला किंवा गावात पसरलेला आजार गावातल्या विशिष्ट स्त्रीमुळं झाला आहे, ही अमानवी अंधश्रद्धा बाळगणं म्हणजे डाकीण. खान्देशात काही दिवसांपूर्वी एका महिलेला खांबाला बांधलं होतं. काहीजण अघोरी पद्धतीनं तिच्या शरीराला चटके देत होते. याची शहानिशा केली असता सातपुड्याच्या कडेकपारीतील एका गावातील ही घटना होती.

चटके दिले जाणाऱ्या महिलेची परिस्थिती हालाखीची तसंच ती बारा वर्षापासून मनोरूग्ण होती. त्यामुळं तिला ‘डाकीण’ ठरवलं गेलं. ती राहत होती त्या गावातला एका प्रतिष्ठित माणसाचा मुलगा अचानक गेला, त्याचं खापर गावकऱ्यांनी त्या महिलेवर फोडलं.तिला डाकीण ठरवलं. तिच्या अंगातली ‘डाकीण’ उतरवण्यासाठी तिचे आईवडील मांत्रिकाकडे गेले आणि त्याच्यासमोर मजुरीचे पैसे रिते करून कफल्लक झाले. इतकंच नव्हे तर तिला चटके देण्यात आले. ही घटना सोशल मीडियावरून सर्वत्र पोहोचल्यावर ती खऱ्या रूपानं जगासमोर आली. एखादीला डाकीण, भुताटकी समजून थुंकी चाटायला लावणे, निखार्यावरून चालायला लावणे, सिगारेट-तापलेल्या सळईचे चटके देणे आणि शेवटी आर्थिक लुबाडणूकही करणं… हे अतिशय अघोरी कृत्य आहे. डाकीण प्रथेवर बंदी असूनही अजूनही जात पंचायतीच्या नावाखाली असे प्रकार घडताना दिसतात.

अशा परंपरा आणि अंधश्रद्धांमुळे माणसाला मानसिक, शारीरिक, आर्थिक़, व्यावसायिक त्रास होतोच. आदिवासी बहुल अथवा जंगलाने व्यापलेल्या भागामध्ये रहाणार्या लोकांवर अंधश्रद्धेचा पगडा जास्त असल्याचं दिसून आलं आहे. आजारी पडलं, आर्थिक संकट आलं, कोणी दगावलं, देवाचं काही ‘चुकलं’ तर त्याचं खापर दुर्बल घटकावर फोडून ‘डाकीण’ ठरवण्याची प्रथा अजूनही चालू आहे. कोणत्याही प्रथा-परंपरा अधिकेतर महिलांवरच लादल्या गेल्याचं दिसून येतं.

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागात स्त्रियांचं शोषण करणारी कुरमाघरं आहेत. मासिक पाळी आलेली स्त्री ही अपशकुनी, अशुभ असते, तिला शिवायचं नाही, इतकंच काय, तिची सावलीही आपल्यावर पडता कामा नये, या अंधश्रद्धेतून कुरमा घराची कल्पना आली असावी. पाळीव प्राण्यांनाही आपण चांगली वागणूक देतो, पण या कुरमाघरातल्या स्त्रियांची परिस्थिती खूप वाईट असते. कुरमा घर खूप छोटं असतं, हवा, उजेडाचा अभाव, वीज नसणं, फाटक्या घाणेरड्या चादरी, बाहेर उकीरडा… हे दृश्य दिसतं. या कुप्रथेमुळे कुरमा घरात जाणं हे अपशकुनी मानलं जात असल्यानं तिथल्या एखाद्या महिलेला आजारी असल्यास वैद्यकीय सुविधा मिळू शकत नाहीत. अशावेळी तिचा मृत्यू झाल्याचीही उदाहरणं आहेत. आदिवासींमधली ही प्रथा म्हणजे स्त्रियांना वाळीत टाकण्याची प्रथा आहे. अलीकडच्या काळात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यात बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे; पण सर्वत्र तो पूर्णपणे यशस्वी झालेला दिसून येत नाही.

नाशिक जिल्ह्यातील हरसूल परिसराती, आदिवासींमध्ये पचवीचा सण म्हणजे नागपंचमीला खूप महत्त्व असतं. पण या दिवशी रात्री कुणी घराबाहेर जायचं नाही, कुणी कितीही आवाज दिला तरी दार उघडायचं नाही, मुलीला माहेरी बोलवायचं नाही- नाहीतर भुताळी येते असं मानलं जातं. तसंच देवाला प्रसन्न करण्यासाठी बकरा, कोंबडा यांचे बळी देण्याची प्रथा तर आदिवासी जमातींमध्ये पूर्वापार चालत आलेली आहे. या प्रक्रियेत काही चूक झाल्यास देवाचा कोप होईल, अशी भीती त्यांच्या मनात असते. होळीचा सण तर सर्वच आदिवासी जमातींमध्ये मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. ‘माडिया गोंड’ ही जमातही हा सण महत्त्वाचा मानते. हे आदिवासी ताडी किंवा मोहाच्या दारूचे सेवन करून रात्रभर होळीच्या भोवती नाचतात.

कोरकू जमात ही रावणभक्त असल्यामुळे दसऱ्याला ते कुंभकर्णाची पूजा करतात. यावेळी रेड्याच्या नाकात वेसण घालून त्याला सजवलं जातं. ढोलक वाजवत त्याची मिरवणूक काढली जाते. त्यावेळी त्यांना इतकं मारतात की त्याचे रक्त रस्त्यावर पडतं. या अघोरी कृतीमुळे देव-देवतां ना ते ‘खूष’ करतात. राहतात, नंतर त्याला मारून त्याचं मांस प्रसाद म्हणून वाटला जातो. अर्थातच दारू पिणं, नाचणं असा आनंदही साजरा केला जातो. सूरजगडावरील तिथले आदिवासी बकरी आणि कोंबड्यांचा बळी देतात. आपली पत्नी अशी अचानक कशी काय मरण पावली, तिच्यावर नक्कीच जादूटोणा झाला असावा आणि याला आपल्याच गावातील एक महिला कारणीभूत असावी. असं वाटून थेट खून केल्याच्याही घटना घडल्यात. इतकंच काय, नवापूर परिसरात तर जादूटोणा, देव अंगात येणं ही गोष्ट थेट शाळकरी मुलांपर्यंतही पोहोचलीय. तिथं सरकारनं बांधलेल्या एका शाळेतील दोन मुलांच्या अंगात डोंगऱ्या देव येतो म्हणून शिक्षक व गावकऱ्यांनी मांत्रिकाला बोलावलं होतं. आदिवासींमध्ये काही सण, घटना, आजारपणं ही अंधश्रद्धा, अघोरी प्रकार आणि व्यसनाधीनता या गोष्टी घेऊन येतात… आणि आर्थिक कर्जही!

शापित व्यक्तीला चटके…
देव, डाकीण, चेटकीण, जादूटोणा… अशा अनेक बाबींवर अघोरी उपाय करण्यासाठी संबंधित लोकांचा बराच वेळ, पैसा खर्च होतो. नवसपूर्ती म्हणून पशूबळी दिला जातो. अमावस्या, पौर्णिमेला भरणाऱ्या जत्रांमध्ये एकाच दिवशी किमान चार ते पाच हजार पशूंचे बळी दिले जातात. बिरोबाच्या जत्रेत तर पारंपरिक वाद्यांच्या गजरात पेटते मडके (त्याला कठे म्हणतात) डोक्यावर घेऊन, शरीरावर ओघळणारे उकळत्या तेलाचे चटके सहन करत काहीजण अनवाणी चालत देवाला जातात. वाडा तालुक्यात एका माणसानं त्याच्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेतला म्हणून तिला उकळत्या तेलात हात घालून पाच रुपयांचं नाणं काढण्याची शिक्षा जात पंचायतीनं दिली. हा अघोरी प्रकार नव्हे काय? ओवाळून टाकलेला लिंबू, अंडी आदी वस्तू ओलांडल्यामुळे आपण शापित होतो, असं वाटून तो दोष घालवणाऱ्या भोंदू बाबाकडे धाव घेतली जाते. हा बाबाही आदिवासींना लुटतो. आदिवासी भागातील या अनिष्ट, अघोरी प्रथांपायी किमान कितीतरी शे कोटी रुपयांची उलाढाल होते. हे सगळं इतकं ‘मॅनेज’ केलं जातं की, त्यात न्यायालयीन आदेश धाब्यावर बसविले जातात. रोजंदारी किंवा तुटपुंज्या पैशांवर कसाबशा जगणाऱ्या आदिवासींचा पैसा अनावश्यक ठिकाणी खर्च होतो.

महाराष्ट्र शासनाने 2013 मध्ये जादूटोणाविरोधी कायदा आणला. अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्या व माणुसकीला काळीमा फासणार्या घटनांना संरक्षण देणार्या जात-पंचायतीच्या अधिकारांना आळा घालणारा जातपंचायतविरोधी कायदाही महाराष्ट्र शासनाने 2017 मध्ये पारित केला. पण तरीही डाकीण, भूत, पिशाच्च यावर विश्वास ठेवून लोकांचा छळ करणार्या घटना आजही आपण बातम्यांमधून ऐकतो. आदिवासी भागातली जात पंचायत अघोरी छळ करण्यात किंवा त्रास देण्यात महत्वाची भूमिका बजावत असतात बरेचदा.

आवकच नाही; गावजेवण कुठून घालणार?
आदिवासींमध्ये अजूनही घोटुलं ही प्रथा पाहायला मिळते. या प्रथेप्रमाणे होळीच्या दिवशी गावातील तरूण-तरूणी आपला जोडीदार निवडू शकतात. एकत्र राहतात. पण बरेचदा गावजेवण घालायला, गावाला दारू पाजायला पैसे नसतात त्यामुळं कितीतरी वर्षं ते बिनलग्नाचे राहतात. गावजेवण दिलं जात नाही तोपर्यंत कोणत्याही धार्मिक कार्यात मान्यता दिली जाणार नाही असं जातपंचायत सांगते. गावकरी वा परिसरात मान्य होत नाही. त्यामुळं पैशांची सोय होईपर्यंत त्यांना मुलंही झालेली असतात. बरेचदा त्यांच्या लग्नासाठी त्यांची मुलं आणि नातवंडंही उपस्थित असतात. पूर्वी त्यांचं जगणं जंगलावर अवलंबून होतं, आता जंगलंच कमी झाली आहेत आणि त्यावरचं जगणंही कमी होत चाललय. अशावेळी स्थलांतर करून रोजगार मिळवणं हेच त्यांच्या हातात पैसे मिळवण्याचं साधन आहे. त्यातून मिळणाऱ्या रोजंदारीतून रोजचीच पोटाची भूक भागत नाही तर गावजेवण काय घालणार? तरीही एखाद्यानं घालायचं ठरवलंच तर कर्ज काढून दारू आणि जेवणावळींनी गावाला खुश केलं जातं. पण कर्ज आणि त्यावरचं व्याज या विळख्यात तो सापडतो, तो कायमचा… एका प्रथेला खतपाणी घालताना खासगी सावकाराच्या कर्जाच्या जबड्यात अडकतो, तो वर न येण्यासाठी…

प्रथा, परंपरा या मानवी जगण्याचा अविभाज्य भाग असला तरी ज्या कालबाह्य अनिष्ट प्रथा आहेत, ती मोठी सामाजिक समस्या आहे. एका दुसऱ्यावर नाही; तर अख्ख्या समाजावर विपरीत परिणाम करणारी! या प्रथा बदलत्या काळानुसार सोडून द्यायला हव्यात. बरेचदा आदिवासी परिसरातील अनिष्ट प्रथा चालू राहण्याला त्यांच्या परिसरातील अभावग्रस्ततेचं जीणं अवलंबून असेल. शहरांपासून, आधुनिक जगापासून लांब दुर्गम भागात असणारे पाडे, अपुरी किंवा नसलेली दळणवळणाची सुविधा याला कारणीभूत असतील. डॉक्टर यायला तयार आहेत आणि अत्याधुनिक आरोग्य केंद्रही आहेत; पण तिथं वीज-पाणी-मोबाईलला रेंज नसेल तर शहराच्या सतत संपर्कात असणारा, वीज-पाण्याशिवाय प्रसूती न करू शकणारा डॉक्टर नावाचा माणूस तिथं राहील काय?

अशा परिस्थितीत आजारी पडल्यास जवळपास उपलब्ध असलेल्या भोंदू बाबाकडंच जाणार! इतकंच नव्हे, तर उच्च शिक्षणाच्या नसलेल्या सोयी, सार्वजनिक वाहतुकीचा अभाव, भरपूर पैसे मिळवून देणाऱ्या नोकऱ्या करण्याची क्षमता नसण्यास कारणीभूत असलेली भौगोलिक, आर्थिक़ परिस्थिती असताना भरपूर शिकून शहाणं होणारे लोक इथं फारसे दिसत नाहीत. त्यामुळं आपल्या आधीच्या चार पिढ्यांनी ज्या प्रथा, नियम पाळले तेच तेही पाळताना दिसून येतात. एकूणच व्यवस्थेत फरक पडल्यास सकारात्मक बदल शक्य आहे.

शहरी भागातही उच्चशिक्षण घेतलेले, मुबलक पैसा असलेले लोक जिथं अजूनही अघोरी प्रथांना बळी पडल्याच्या बातम्या येतात…
तिथं आदिवासींची काय कथा?
अनेकदा मळकट कळकट फाटके कपडे घातलेल्या गरीब आदिवासींच्या गराड्यात परीटघडीचे शुभ्र कपडे घातलेला एखादा राजकारणी किंवा पुढारीच अशा प्रथांना आपल्या स्वार्थासाठी हवा देत असेल, तर आपण बदलाविषयी कसं आाणि काय बोलावं!

प्रमोद गोपाळराव गायकवाड, नाशिक
संस्थापक, सोशल नेटवर्किंग फोरम
[email protected]
Mob – 9422769364
Trible Issues Superstition Government Administration by Pramod Gaikwad

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आता उद्धव ठाकरे काय बोलणार? बघा त्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – ठगू मावशीचं उत्तर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कामे अर्धवट सोडू नये, जाणून घ्या, बुधवार, १० सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 9, 2025
Gyj9FwXXMAAG8KV
महत्त्वाच्या बातम्या

उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विजयी…पडली इतकी मते

सप्टेंबर 9, 2025
‘नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित 2 1024x757 1
संमिश्र वार्ता

राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इतके कोटी रुपये जमा

सप्टेंबर 9, 2025
IMG 20250909 WA0402 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे उद्या उद्घाटन…केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री, मंत्री भुजबळ, महाजन यांची विशेष उपस्थिती

सप्टेंबर 9, 2025
NMC Nashik 1
स्थानिक बातम्या

नाशिक महानगरपालिकेत प्रभाग रचनेवरील ९१ हरकतीवर सुनावणी संपन्न…

सप्टेंबर 9, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
संमिश्र वार्ता

नेपाळसारखी दुर्घटना कोणत्याही देशात घडू शकते! सावध राहा!…संजय राऊत यांचे ट्विट

सप्टेंबर 9, 2025
bhujbal 11
संमिश्र वार्ता

छगन भुजबळांची नाराजी कायम…मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले हे पत्र

सप्टेंबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

घर गहाण प्रकरणात दहा लाखाला गंडा….अशी केली फसवणूक

सप्टेंबर 9, 2025
Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - ठगू मावशीचं उत्तर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011