मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला हा संबंधित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात विहित मुदतीत उपलब्ध होणार असल्याचे, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.
मंत्री डॉ. गावित म्हणाले, मा. राज्यपाल यांच्या दि.२९.०८.२०१९ च्या अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याची मान्यता मिळाली आहे. राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या ५० टक्के पेक्षा अधिक आहे, अशा सर्व गावांमध्ये १७ संवर्गातील सरळसेवेची १०० टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय झालेला आहे. सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रकल्प कार्यालयात रहिवासी दाखला मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.