नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या आदिवासी विकास विभागाचा कारभार नाशिकमधून चालतो. नाशिकमध्येच विभागाचे मुख्यालय आहे. आयुक्तांसह विविध वरिष्ठ अधिकारी येथे असतात. काही दिवसांपूर्वीच विभागातील दोन मोठे लाचखोर लाच घेताना सापडले आहेत. त्यात एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर दिनेशकुमार बागुल आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रताप वडजे हे दोघेही जेरबंद झाले. त्यांना न्यायालयाने कोठडी सुनावली. त्यातच आता आदिवासी विकास प्रशासनाने महत्त्वाच्या कामांची जबाबदारी कनिष्टांकडे देऊन नवा वाद ओढवून घेतला आहे.
आदिवासी विकास विभागाने काढलेल्या आदेशानुसार, लेखाधिकारी जेजुरिकर यांचेकडील कार्यभार कनिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे. तर, आदिवासी विभागाचा कणा असलेल्या विकास शाखेचा सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत साळवे यांचाही कार्यभार काढून घेण्यात आला आहे. आता हा कार्यभार एका कनिष्ठ गृहपालाकडे देण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, या निर्णयामुळे विभागावर पुन्हा जोरदार टीका होण्याची चिन्हे आहेत.
Trible Development Department Controversy Orders