नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आदिवासी बांधवांच्या कलाकुसरीला हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्या कलांचे कायमस्वरूपी जतन व संवर्धन करण्यासाठी आदिहाट सुरू करण्यात येणार आहे. आदिवासी विकास आयुक्त, सर्व अपर आयुक्त व प्रकल्प कार्यालयात आदिहाटचे उद्घाटन आज 26 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी दिली आहे.
आदिहाटच्या माध्यमातून आदिवासी कुटूंबांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू, आदिवासी संस्कृतीशी निगडीत साहित्य, वस्तू, खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. आदिवासी विकास विभागातंर्गत असणाऱ्या सर्व क्षेत्रीय कार्यालयासोबतच आदिवासींच्या स्थानिक जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे रेल्वे आणि बस स्थानक येथेही हे आदिहाट उभारण्यात येणार आहे. आदिवासी बांधवांच्या हातातल्या कलाकुसरीला आदिहाट मधून शहरांच्या ठिकाणी असणारा जाणकार ग्राहक वर्ग मिळणार असून त्यामुळे रोजगार निर्मीतीसाठी मदत होणार आहे, असेही आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी सांगितले आहे.
Trible Development Aadihat Project Launching