नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय नाशिकला असून सध्या हा विभाग लाचखोरीमुळे विशेष चर्चेत आला आहे. याच विभागाचा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर दिनेशकुमार बागुल हा तब्बल २८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडला गेला आहे. ही घटना ताजी असतानाच आता याच विभागातील कळवण विभागाचा सहाय्यक प्रकल्प अधिकारी जाळ्यात सापडला आहे. या अधिकाऱ्याने चक्क टॉयलेटमध्ये १० हजाराची लाच घेतली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले आहे.
राज्याचा आदिवासी विकास विभाग आणि त्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कारभार सध्या प्रचंड चर्चेत आहे. राज्य सरकार आदिवासींसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देते. मात्र, आदिवासींपर्यंत ते पोहचतात की नाही, अशी शंका निर्माण होते. कारण, गेल्या अनेक वर्षात आदिवासी बांधवांची स्थिती फारशी सुधारली नसल्याचे वास्तव आहे. अशातच या विभागात लाचखोरीचे पीक चांगलेच फोफावल्याचे दिसून येत आहे.
गेल्या आठवड्यात या विभागाचा एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर दिनेशकुमार बागुल हा चक्क २८ लाख रुपयांची लाच घेताना त्याच्या निवासस्थानी रंगेहाथ पकडला गेला. याला काही दिवस उलटत नाही तोच आता कळवणचा सहाय्यक प्रकल्प अधिकारी एसीबीला गवसला आहे. आदिवासी भागातील कामासाठी त्याने लाच मागितली होती. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि हा अधिकारी आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एसीबीच्या हाती लागला आहे. या अधिकाऱ्याने टॉयलेटमध्ये १० हजार रुपयांची लाच स्विकारली आहे. याप्रकरणी एसीबीने अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
Trible Department Bribe ACB Raid Officer Caught
Nashik Kalwan Additional Project Officer Corruption