मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासकीय /अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता स्वयंअध्ययन व खेळ यांकरिता पुरेसा वेळ मिळावा तसेच राज्यातील सर्व शासकीय /अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये एकसमान शाळेचे वेळापत्रक असावे, यासाठी शाळेच्या नियमित वेळेमध्ये बदल करुन शासकीय व अनुदानित आदिवासी निवासी आश्रमशाळेची वेळ सकाळी 8. 45 वाजता ते दुपारी 4.00 वाजता ठेवण्याबाबत व त्याची अंमलबजावणी दिनांक 10 जुलै, 2023 पासुन करण्याबाबत दिनांक 5 जुलै, 2023 रोजीच्या पत्रान्वये निर्देश देण्यात आलेले आहेत. 4870
दिनांक 5 जुलै, 2023 रोजीच्या शासन पत्रान्वये दिलेल्या निर्देशास अनुलक्षून आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी त्यांच्या स्तरावरुन नवीन शालेय वेळापत्रक तयार करुन क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. या नवीन वेळापत्रकाप्रमाणे सकाळच्या नास्त्याची वेळ सकाळी 7.30 ते 8.00 वाजता असून डॉ. सुभाष साळुंखे समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे याआधी तयार केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सकाळी 7.45 ते 8.30 वाजता नास्त्याची वेळ आहे, तर नवीन वेळापत्रकाप्रमाणे दुपारच्या जेवणाची वेळ दुपारी 12.30 ते 13.30 अशी असून याआधीचे वेळापत्रकाप्रमाणे दुपारचे जेवणाची वेळ 12.45 ते 13.45 अशी आहे. यामध्ये केवळ 15 मिनिटांचा फरक आहे, तर नविन वेळापत्रकाप्रमाणे रात्रीचे जेवणाची वेळ 18.30 ते 19.30 अशी असून पुर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे 19.30 ते 20.30 अशी आहे. नवीन वेळापत्रकाप्रमाणे झोपण्याची वेळ 21.30 ते 5.30 अशी असून या कालावधीचा विद्यार्थ्यांच्या भोजनाशी ताळमेळ करणे संयुक्तिक होणार नसून दोन जेवणामध्ये जास्त अंतर आहे असे म्हणणे उचित नाही.
वास्तविक, शासकीय /अनुदानित आश्रमशाळा या निवासी असून या आश्रमशाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन व खेळ यांकरिता पुरेसा वेळ मिळावा याकरिता नविन वेळापत्रक तयार करण्यात आलेले असून विद्यार्थ्यांचे आरोग्य, अभ्यास, भोजन व इतर सोयी-सुविधा याकडे दुर्लक्ष होऊ नये व विद्यार्थ्यांवर पूर्ण वेळ लक्ष ठेवण्याकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना आश्रमशाळा परिसरात राहण्याबाबत दिनांक 24 ऑगस्ट, 2021 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत.