नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील आदिवासी विकास विभागातील सर्व शासकीय आश्रमशाळांमधील रिक्तपदे भरुन आगामी काळात शैक्षणिक गुणवत्तेच्या प्राधान्यासह विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांवर अधिक भर देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी लोभानी येथे केले.
तळोदा तालुक्यातील लोभानी येथील शासकीय आश्रमशाळेच्या प्रांगणात रोजंदारी पदावर करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेशाचे वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार डॉ.हिना गावित, विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त श्रीमती.नयना गुंडे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, आदिवासी विकास विभाग नाशिकचे अपर आयुक्त संदीप गोलाईत आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.गावित म्हणाले की, राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या 10 वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या वर्ग तीन, वर्ग चार कर्मचाऱ्यांना 6 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार आदिवासी विकास विभागाने घेतला असून या निर्णयांचा राज्यातील 645 कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आले आहे. आज तळोदा प्रकल्पांतील 244 वर्ग 4 कर्मचाऱ्यांना पालकमंत्री डॉ.गावित यांच्या हस्ते कायम नियुक्तींचे आदेशाचे वाटप करण्यात आले. या सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतनस्तरावर वेतननिश्चिती करुन लाभ मिळणार असून कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता नियमितीकरणाच्या दिनांकापासून लागू करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार डॉ.हिना गावित, आमदार आमश्या पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांचे आदिवासी पारंपारिक ढोल वादन व नृत्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळांमध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या वर्ग चार प्रकारच्या कर्मचाऱ्यांना कायम नियुक्ती आदेशाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.टी.पाटील व सुधाकर मोरे यांनी केले. तर प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहायक प्रकल्प अधिकारी बी.एफ.वसावे, डी,जी,वाणी,शिक्षण विस्तार अधिकारी बी,आर,मुगळे, यांच्यासह लोभाने आश्रम शाळेचे मुख्याध्यापक व प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Trible Ashramshala 645 Employees Government Service