इंडिया दर्पण विशेष लेखमाला
व्यथा आदिवासींच्या – भाग २५
व्यसनाधीनता- सामाजिक समस्या
“व्यसनमुक्तीः हवीय पर्यायी व्यवस्था…!!”
दारूच्या दुष्परिणामांविषयीच्या चर्चेत एक तरुण म्हणाला,” फक्त आदिवासी लोकच दारू पितात का ?” त्याचे म्हणणे बरोबर होते. व्यवसानाधीनता ही आजच्या घडीची सार्वत्रिक समस्या आहेच. पण गरिबी, शिक्षणाचा अभाव, रोजगारांची अनुपलब्धता यामुळे व्यसनमुक्तीची अधिक गरज आदिवासी भागात आहे.
एका महिलेची प्रसूती झाली. घरीच. त्यानंतर लगेचच तिला दारू पाजली गेली. प्रसूतीनंतर महिलेला दारू पाजणे, ही नंदूरबार परिसरातील दुर्गम भागातल्या आदिवासींमधली प्रथा आहे. वर्षानुवर्षं ही प्रथा अजूनही पाळली जात आहे.
‘‘अजूनही तुम्ही या प्रथा का पाळता?’’
यावर ‘बाईचं दुखणं कमी होतं’ असं उत्तर मिळालं.
‘‘दारू पाजल्यावर बाईचं दुखणं कसं कमी होतं?’’
‘‘तिला काहीच कळत नाही, ती झोपते.’’
दारू प्यायल्यावर शुद्ध राहत नाही, वेदना जाणवत नाहीत, पण त्या कमी झालेल्या नसतात. दुर्गम भागातल्या अनेक गावांमध्ये अजून वीज पोहोचलेली नाही; पण तिथं दारू मात्र मुबलक मिळते. दारूचं व्यसन आणि व्यसनाधीनता ही काही आदिवासी जमातींमधील परंपरा आहे. नुकत्याच प्रसूती झालेल्या महिलेला दारू पाजल्यावर ती तिच्या बाळाकडं कसं लक्ष देऊ शकेल? तिची, बाळाची स्वच्छता आणि आरोग्याची काळजी ती कशी घेऊ शकेल? मुख्य म्हणजे बाळाला दूध पाजताना दुधातून दारूचा अंश नवजात बालकाच्या शरीरातही जाईल. बाळाला सांभाळताना भान राहणार नाही. काही वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील एक आदिवासी महिला आपल्या नवजात बाळाला घेऊन शेकोटीशेजारी झोपली होती. पण रात्री खाटेवरची मुलगी खाली शेकोटीत पडली आणि जळून ठार झाली. दारू प्यायलेल्या त्या महिलेला कितीतरी वेळ काय घडलंय, ते समजलंच नव्हतं.
अशा अनेक घटना घडत असूनही आदिवासी भागातील व्यसनाधीनतेचं प्रमाण कमी झालेलं नाही. अलिकडंच पेठ-सुरगाणा भागात घडलेल्या एका घटनेत दारूला पैसे दिले नाहीत म्हणून एका माणसानं त्याच्या बायकोच्या डोक्यात रॉड घातल्याची घटना घडली.
मोहाच्या फुलांपासून, गुळापासून दारू गाळणारेही आदिवासीच आणि त्या दारूसाठी कुटुंबात, समाजात झगडणारेही आदिवासीच. डहाणूच्या परिसरात अजूनही तेथील आदिवासी महिला देशी दारू तयार करताना दिसतात. एकीशी संपर्क साधला असता ती म्हणाली,
‘‘आधी आई हे काम करत होती, आता मी करते.’’
स्थलांतर न करता स्थानिक भागात पैसा मिळवण्याचं दारू हे एक साधन झालंय.
नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी भागातल्या एका शाळेतल्या मुलीला वडिलांबरोबर तालुक्याच्या ठिकाणी जावं लागायचं. दारू पोहोचवण्याचं काम ती करायची. हे सर्व चित्र अतिशय दाहक आणि वेदनादायी होतं. त्यावेळेला तिथल्या सजग शिक्षकांनी पालकांच्या अवैध व्यवसायापासून मुलांची सुटका करायची असं ठरवलं. मोठ्या कष्टानं त्यांनी त्यात यश मिळवलं. चांगले शिक्षक त्या मुलीला भेटले नसते तर…
दिवाळीनंतर अनेकजण रोजगारासाठी कुटुंबासह स्थलांतर करायचे, मात्र काहीजणांनी स्थलांतर थांबवत पोटापाण्यासाठी गावातच एक व्यवसाय शोधून काढला होता. तो होता, ‘गावठी दारू’ गाळण्याचा. पैसे मिळत असल्यानं गावातील जवळपास साठ टक्के लोक हाच व्यवसाय करत. दोन किलोमीटरवर असलेलं बाजारपेठेचं गाव सुरगाणा, जवळच असलेली गुजरातची सीमा आणि सापुताऱ्यासारखं पर्यटन स्थळ यामुळं मोहाच्या फुलांपासून किंवा कधी गुळापासून तयार होणाऱ्या या अवैध दारूचा व्यवसाय चांगलाच बहराला आलेला होता. इतका की गावातील काही घरांमध्येच थेट ग्राहक दारूसाठी येत असत. याच घरांमध्ये शाळेत येणारी लहान मुलंही असत. बरेचदा पालक त्यांच्याकडूनही हे काम करवून घेत असत. तिसरी, चौथीतली मुलं अनेकदा पालकांच्या धाकापोटी दारू पोहोचविणे, ग्राहकांना दारू देणे इत्यादी कामांत गुंतलेली होती. त्यामुळे त्यांची इच्छा असूनही त्यांना या दुष्टचक्रातून बाहेर पडता येत नव्हतं.
या व्यवसायाचा आणखी एक गंभीर सामाजिक परिणाम झाला होता. तो म्हणजे घराघरात दारू तयार करणाऱ्या पुरुषांनाच दारुचं व्यसन लागलं होतं. दारुच्या आहारी गेल्यानं ऐन चाळिशी-पन्नाशीत गावातील अनेक पुरुष दगावत आणि त्यांची मुलं उघड्यावर पडत, तर त्यांच्या विधवांसमोर कुटुंब चालविण्याचा मोठा प्रश्न अचानक उभा राहत असे. हा प्रश्न सोडवण्यासाठी तेथील शिक्षकांनी पुढाकार घेतला तरी अजून यशाचा बराच पल्ला त्यांना गाठायचाय. आदिवासी भागात पूर्वी केवळ कुटुंबासाठी दारू बनवली जायची मात्र आता त्याचा वापर एक व्यवसाय म्हणून केला जातो. त्यामुळे दारूचं प्रमाण अजूनही जास्त आहे
ही झाली दोन गावांची गोष्ट! अशा अनेक गावांच्या अनेक गोष्टी आहेत. दारू आणि दारूचा व्यवसाय म्हटले की तो आपल्यासोबत शारिरीक व्याधींबरोबर सामाजिक, मानसिक अस्वास्थ्यही घेऊन येतो. या गावातही तसंच व्हायचं. दारूड्यांची संख्या वाढल्यानं, त्यातून गैरवर्तनही होतं. दारू ही आदिवासी भागात पौष्टिक आणि प्रतिष्ठेची समजली जाते. लग्नकार्य असो, सणवार असोत वा एखादा दुःखद प्रसंग… दारू ही लागतेच. परंपरेला दारू जोडल्यानं ती नियमित प्यायली जाते. अगदी लहान मुलांसमोरही दारू प्यायली जाते. जत्रा-यात्रांमध्ये मांसाहार आणि दारू असतेच. दारू नसेल तर लग्नाची जेवणावळ पूर्ण होऊच शकत नाही, हे वास्तव आहे. दारूला प्रतिष्ठा देणाऱ्या या परंपरा नकळतपणे व्यसनाधीनतेलाच खतपाणी घालत असतात. आदिवासी भागातली दारू तयार करण्याची पद्धत पाहता ती तशीच दारू पोटात गेल्यास शरीराचं काय होत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी!
काही आदिवासी पाड्यांमध्ये मोहाच्या फुलापासून घरीच दारू तयार केली जाते. मुलं लहानपणापासून ही प्रक्रिया पाहत असतात. अशा घरांमध्ये दारू पिणं हे वेगळं आणि चुकीचं आहे असं समजलंच जात नाही. घरातल्या महिला, मुलं यांनाही त्याची सवय असते. दारू गाळणं हे बेकायदेशीर आहे, तरीही अनेक ठिकाणी ती गाळली जातेच. मध्यंतरी आदिवासी भागातील शाळेत बांबूपासून तयार केलेली आदिवासींची वाद्य, भांडी यांच्याबरोबर दारू गाळण्याचं भांडंही दिसलं होतं. इतकी ही परंपरा भिनलीय.
मुलांना विचारलं, ‘‘तुमच्या घरात मोहाची दारू कशी तयार करायची का, हे माहितीय का?’’
मुलं म्हणाली, ‘‘त्यात काय, सगळ्यांनाच माहितीय.’’
एका आदिवासीबहुल शाळेतील शिक्षक सांगत होते की, दारू प्यायल्यानं त्यांच्या गावातले खूप लोक मृत्युमुखी पडलेत. अनेक जण दारू पिऊन आणि विकून मरतात. दारू प्यायल्यामुळे आधीच असलेल्या सिकलसेल आणि कुपोषणाच्या समस्यांमध्ये भर घातली जाते. इतकंच नाही तर हृदयाच्या, किडनीच्या आणि आतड्यांच्या संबंधीचे आजार सुद्धा वाढतात. दारूच्या नशेत असल्यानं टोकाला गेलेला एखादा आजार समजतही नाही. तसंच त्यासाठी डॉक्टरांना दाखवायचंही कळत नाही. परिणामी, आजार वाढत जातो आणि त्यात लोकांचा बळी जातो. म्हणूनच एका गावातले कितीतरी मध्यमवयीन लोक दारूचे बळी ठरले, असं म्हणण्यात अतिशयोक्ती अजिबात नाही.
‘‘तुमच्याकडं खरंच मोहाची दारू करतात का?’’ असं विचारल्यावर दुर्गम भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते सांगतात की, ‘‘आता कुणा आयुर्वेदिक औषध तयार करणाऱ्या कंपनीला लागतं म्हणून आमच्याकडं एकच महिला मोहाची दारू तयार करते. पण बाकी गूळ, नवसागर यापासूनच ही दारू तयार करतात. ती करण्यात महिलांचं प्रमाण जास्त आहे. इथले पुरुष तुम्हाला दारू तयार करताना दिसणार नाहीत. पण आता काहीजण ‘ब्रँडेड’ परदेशी दारूही विकत आणताना दिसतात. भले, दोनशे रुपये रोजंदारीतले शंभर रुपये दारूमध्ये जावोत. पण त्या शंभर रुपयांमध्ये किराणा किंवा भाजीपाला आणावा, असं त्यांना वाटत नाही. कारण दारूनं त्यांच्या मेंदूचा आणि विचारशक्तीचा पूर्ण ताबा घेतलेला असतो. मग भले त्यासाठी पैसे नसल्यास ते बायकोशी भांडतील, पैसे उसने घेतील किंवा कर्जही घेतील.’’
या कार्यकर्त्यांच्या मते, दारूला पैसे हवेत म्हणून भांडणं, मारामाऱ्या नेहमीच होत असतात. दारूला पैसे न दिल्यानं आपल्या पत्नीच्या डोक्यात रॉड घालून ठार मारण्याची घटना नुकतीच घडली. दारूमुळं हिंसा, नकारात्मकता वाढीस लागते. नैराश्य येतं. १४ ते १६ वर्षांची मुलंही तंबाखू, दारूचं व्यसन करायला लागली आहेत. तरूण मुलांमधलं व्यसनाचं प्रमाण वाढलं आहे. व्यसनाधीनता तीच आहे; फक्त परंपरा जाऊन त्याची फॅशन झालीय. दारू प्यायल्यावर काम न करणं, बसून राहणं, सतत मनात दारूचा विचार घोळणं… यामुळं तरूणांमध्ये कितीतरी आत्महत्त्या वाढल्या आहेत, ही चिंताजनक बाब आहे.
आदिवासी पाड्यांवर घरीच दारू बनत असल्यामुळे बरेचदा दारूचं अतिसेवन केलं जातं. ती मुबलक उपलब्ध असते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या फार मोठ्या आहेत. दारूच्या व्यसनामुळे आदिवासी भागात अस्वच्छतेचं प्रमाण खूप आहे. नशेत आपण काय करतोय याकडे माणसाचे लक्ष नसते. अनेक घरात, वैयक्तिक स्वच्छता पाळली जात नाही. परिणामी, घराच्या आत आणि बाहेर तसेच गावात अस्वच्छता जशीच्या तशी राहते.
पूर्वी आदिवासी समाजात कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण कमी होतं, मात्र नागरी समाजाच्या संपर्कामुळे, दारूच्या व्यसनामुळे कौटुंबिक हिंसाचार, मारामारी, खून, गुन्हे यांचं प्रमाण वाढत आहे. जिथे दारूची नशा केली जाते, तिथे ही समस्या जास्त असते. त्यामुळं आदिवासी भागात ही समस्या वाढत चालली आहे. दारूच्या नशेत आदिवासी पालकांनी मुलांना मारहाण करणे, पतिपत्नीत भांडण, गावातील लोकांबरोबर वादविवाद होण्याचं प्रमाण वाढलं आहे.
अनेक आदिवासीबहुल भागांमध्ये तर दारूबंदीही लागू करण्यात आली आहे. पण आजही आदिवासी आणि दारू पिणं याबद्दल चर्चा होत असते. महिलांमध्येही या व्यसनाचं प्रमाण वाढलंय. महिलांच्या दारू पिण्याच्या प्रमाणात धुळे जिल्हा ३८.२ टक्क्यांसह अव्वल आहे. तर त्यापाठोपाठ गडचिरोली ३.१ टक्के, नंदुरबार २.८ टक्के आणि पालघर जिल्ह्यात १.४ टक्के महिला दारू पितात. सोबतच पुरुषांच्या बाबतीत गडचिरोली ३४.७ टक्क्यांसह अव्वल आहे, तर त्यापाठोपाठ भंडारा ३६ टक्के, वर्धा २४.४ आणि गोंदिया जिल्ह्यात २२.६ टक्के पुरुष दारू पितात.
मध्यंतरात अति दारूच्या दुष्परिणामांविषयी बोलत होतो. एक तरुण मला म्हणाला फक्त आदिवासी लोकच दारू पितात असे नाही. गैर आदिवासीही पितात. त्याचे म्हणणे बरोबरच आहे. व्यवसानाधीनता ही आजच्या घडीची सार्वत्रिक समस्या आहेच. पण ती आदिवासी भागात जास्त आहे. गरिबी, शिक्षणाचा अभाव, रोजगारांची अनुपलब्धता यामुळे आदिवासी समाज आधीच त्रासलेला आहे . त्यात या व्यवसनाधीनतेमुळे अनेक कुटुंबे देशोधडीला लागतात. त्यामुळे आपल्याला त्यापासूनच्या मुक्ततेची अधिक गरज आहे हे माझे म्हणणे सुदैवाने त्या तरुणाला पटले आणि आपल्या गावात व्यसनमुक्ततेचे काम करायचे त्याने ठरवले.
ही समस्या सोडवण्यासाठी आदिवासी विकास विभाग आणि सरकारी यंत्रणेने पुढाकार घेणं गरजेचं आहे. तसंच सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. राज्यात काही ठिकाणी दारूबंदी करण्यात आलीय. १९९४ सालात गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आलीय. मात्र अजूनही दारू पिण्याचं प्रमाण कमी झालेलं नाहीय. जिल्ह्यातील आदिवासी तसेच इतर समाजातील दारूचं पिण्याचं प्रमाण कमी व्हावं आणि त्यांची आर्थिक प्रगती व्हावी हा या दारूबंदीमागील उद्देश होता. मात्र अलीकडे जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ३४.७ टक्के पुरुष आणि ३.१ टक्के महिला दारू पितात असं आढळून आलंय.
दारूबंदी केल्यामुळे जगातील अनेक भागात सुधारणा घडून आलेल्या आहेत. हीच गोष्ट आदिवासी भागावर लागू होते. आदिवासी भागात जिथे चांगल्या पद्धतीने दारूबंदीची अंमलबजावणी करण्यात आली तिथे बदल घडून आलेला आहे. इतर नागरी समाजाच्या तुलनेत आदिवासी समाज जास्त मागासलेला आहे, त्यामुळे या भागात दारूबंदी करून विकासाला पूरक वातावरण निर्माण करणे गरजेचं आहे. आदिवासी समाज दारू पितो म्हणून तो स्वस्थ असतो किंवा दारू पौष्टिक असते असा दावा अगदी निराधार आहे, असं आदिवासी भागातील सामाजिक कार्यकर्ते सांगतात.
आदिवासी भागात परंपरा म्हणून दारू पिण्याची प्रथा असली, तरी नंतरच्या काळात आदिवासी समाजाबद्दलची सरकारची चुकलेली धोरणेही या समस्येला कारणीभूत असल्याचे निरीक्षण या भागातील सामाजिक कार्यकर्ते नोंदवितात. वनहक्क कायद्यांच्या कचाट्यात आजही आदिवासी सापडलेला आहे. जाचक कायदे आणि नियमांमुळे आपल्याच जमिनीवरून त्याला विस्थापित होण्याची वेळ आलेली आहे. दुसरीकडे रोजगाराचीही समस्या कायम आहे. अजूनही अनेक भागात तरुणांना पुरेसे काम मिळत नाही. आजही अनेक भागांत शिक्षणाची चांगली सोय नाही. चांगले रस्ते, वीज, पाणी यांची सोय नसल्यानं शहरातील शिक्षक व सरकारी कर्मचारी आदिवासी भागात राहण्यासाठी नाखूष असतात.
अपवाद वगळता या ठिकाणी कुणीही स्वत:च्या मर्जीनं काम करताना दिसत नाही. अनेकदा सरकारी योजना या कागदावर खूप चांगल्या दिसतात, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. परिणामी आदिवासींपर्यंत त्या पोहोचत नाहीत. आजही नंदुरबार जिल्ह्यातील धडगांवजवळ काही आदिवासी नर्मदा नदी पलीकडे राहतात, त्यांना शहरात किंवा बाजारासाठी यायचे असेल, तर पुलाचीही व्यवस्था नाही की चांगले रस्ते नाहीत. नाशिक जिल्ह्यातही असे कितीतरी दुर्गम पाडे आहेत. त्यामुळं आजही हे लोक मुख्य समाजापासून, दळणवळणाच्या सोयींपासून तुटलेलेच आहेत.
योग्य शिक्षण, पायाभूत सुविधांचा जलद विकास, शेती आणि पशुसंवर्धनातील काम, भ्रष्टाचाररहित योजनांची अंमलबजावणी, रोजगाराच्या मुबलक संधी या गोष्टी जर आदिवासी समाजात पोहोचल्या, तर त्यांच्यामध्ये आदिम काळापासून चालत आलेल्या रुढी-परंपरा जाऊन, ज्ञानाचा प्रकाश पोहोचेल आणि रोजगारातून, राहणीमानाच्या संपन्नतेतून त्यांचे आयुष्यही व्यसनमुक्त व समृद्ध होईल. पण हे लक्षात कोण घेतो घेतो?
प्रमोद गोपाळराव गायकवाड, नाशिक
संस्थापक, सोशल नेटवर्किंग फोरम
gaikwad.pramod@gmail.com
Mob – 9422769364
Trible Area Issues Habit Liquor Drinking by Pramod Gaikwad