नाशिक – शिक्षण पद्धतीत अनेक नवनवीन बदल होत आहेत. विद्यार्थी हे उद्याचे सक्षम नागरिक आहेत. आधुनिक काळातील बदलत्या आव्हानाचा सामना करण्यासाठी या शाळांमध्ये आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञान आणि शिक्षणातील नवे आयाम पोहचविण्यासाठी शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे चालवल्या जाणाऱ्या शासकीय आश्रमशाळांपैकी १०० शाळांचे रुपांतर आदर्श आश्रमशाळेत होणार आहे. अशी माहिती आदिवासी विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी शासकीय प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात नमूद केल्यानुसार, सध्या राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आदिवासी विकास विभागांतर्गत एकूण ४९९ शासकीय आश्रमशाळा कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आणि गुणवत्तापूर्ण विकासामध्ये या आश्रमशाळांचे योगदान उल्लेखनीय आहे. विभागांतर्गत ३० प्रकल्प असून प्रत्येक प्रकल्प कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या आश्रमशाळापैकी २५% आश्रमशाळाची निवड “आदर्श आश्रमशाळा” म्हणून करण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्प अधिकारी यांना पुढील निकषांचा आधार घेऊन त्यांच्या प्रकल्पातील आदर्श आश्रमशाळांची निवड करता येईल.
असे आहेत निकष
१. आदर्श आश्रमशाळेसाठी आदिवासी विकास विभागाच्या नावे किमान ५ हेक्टर जमीन असावी.
२. नवीन टाईप प्लॅनप्रमाणे शाळा इमारत व किमान एक स्वतंत्र वसतिगृह इमारत असावी.
३. आजूबाजूच्या परिसरातील आश्रमशाळेच्या तसेच इतर अशा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ
मिळेल या अनुषंगाने केंद्रस्थानी असलेल्या आणि एकाहून अधिक शाळा समायोजित करून एकच
आदर्श शाळा होईल अशी असावी.
4. शक्यतो आदिवाीस उपयोजना क्षेत्रातील शाळांचीच निवड करण्यात यावी.
५. चांगल्या दळणवळण सुविधा असलेल्या शाळांना प्राधान्य देण्यात यावे.
६. शाळेच्या ठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी व विजेची उपलब्धता आणि इंटरनेट सुविधा असावी.