नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात वैमानिकांची प्रचंड मोठी कमतरता आहे. त्याचा परिणाम विमानसेवेवर झाला आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवा देणाऱ्या कंपन्यांवर वैमानिक उपलब्धतेचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. २०३० पर्यंत देशातील विमान कंपन्यांची क्षमता वार्षिक १०० कोटी प्रवासी एवढी असेल. मात्र, त्या तुलनेत पायलटची उपलब्धता असेल की नाही याबाबत साशंकताच आहे.
जगातील हवाई वाहतूक प्रचंड वेगाने वाढत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार २०२८ सालापर्यंत जगातील विमानांची संख्या सध्यापेक्षा दुप्पट होईल आणि वाहतूक तिप्पट होईल. पुढील २० वर्षांत दरवर्षी २० हजारांच्या आसपास प्रशिक्षित वैमानिकांची गरज भासू शकते. भारतात देखील मोठ्या प्रमाणावर वैमानिक तथा पायलटची गरज भासणार आहे. या क्षेत्रात करिअरच्या संधी मोठय़ा असल्या तरी हे प्रशिक्षण बरेच महागडे आणि कष्टाचे आहे.
वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या आपल्या देशातील काही प्रमुख संस्था आहेत. मात्र, वैमानिकांची कमतरता हे या मार्गात मोठे आव्हान ठरत आहे. भारताला पुढील पाच वर्षांत दरवर्षी 1000 ते 1200 नवीन वैमानिकांची गरज भासेल, जे दरवर्षी बाजारात दाखल होणाऱ्या 600-700 वैमानिकांच्या सध्याच्या दरापेक्षा जवळपास दुप्पट आहे. त्याच वेळी, जागतिक एरोस्पेस दिग्गज बोईंगचे म्हणणे आहे की 2040 पर्यंत जगभरात 6,12,000 नवीन पायलटची आवश्यकता आहे.
विमान चालकाला वैमानिक असे म्हणतात. वैमानिक हा विमानाचा कप्तान असतो. प्रवाशांचा हवाई प्रवास सुखाचा व सुरक्षित व्हावा हे वैमानिकाचे प्रथम कर्तव्य असते. धोक्याची परिस्थिती उद्भवल्यावर ती हाताळणे हे वैमानिकाच्या कौशल्यावर अवलंबून असते. हे असे नैपुण्य त्याला प्रशिक्षणातून आणि अनुभवातून मिळवावे लागते. लढाऊ वैमानिकाला वेगळे प्रशिक्षण दिलेले असते.
भारतीय नागरी विमान वाहतूक बाजारपेठ जगातील सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. दक्षिण आशियातील एकूण हवाई वाहतुकीपैकी भारताच्या देशांतर्गत वाहतुकीचा वाटा ६९ टक्के आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैमानिकांच्या कमतरतेमुळे काही विमान कंपन्यांना नवीन मार्गांवर हवाई सेवा सुरू न करण्यास भाग पाडले जात आहे. देशातील सर्वात मोठ्या एअरलाइन इंडिगोला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) नोटीस बजावली होती कारण तिच्या 900 पैकी 55 टक्क्यांहून अधिक उड्डाणे एकाच दिवसात उशीर झाली होती. कर्मचाऱ्यांची कमतरता हे त्यामागचे कारण असल्याचे सांगण्यात आले.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गेल्या पाच वर्षांत भारतात सुमारे 3,300 व्यावसायिक पायलट परवाने जारी केले आहेत. यामध्ये भारतीय फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन आणि फॉरेन फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन या दोन्हींमधून उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना जारी केलेल्या परवान्यांचाही समावेश आहे. यापैकी भारतीय फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनमधून उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना सुमारे 2,000 परवाने देण्यात आले आहेत.
कमर्शियल पायलट बनवण्यासाठी प्रक्रियेनुसार एकेक पायरी चढावी लागते. आधी स्टुडंट पायलट लायसन्स (एसपीएल) मिळवावे लागते. त्यानंतर प्रायव्हेट पायलट लायसन्स आणि कमर्शियल पायलट लायसन्स मिळवता येईल. हे लायसन्स मिळवण्यासाठी दहावी पास झाल्यानंतर पीसीएम विषय घेऊन अकरावी-बारावी पास होणं आवश्यक आहे. बारावी पास झाल्यानंतर मग लेखी परीक्षा, पायलट अॅप्टिट्यूड टेस्ट, इंटरव्ह्यू आणि वैद्यकीय तपासणी यशस्वीपणे पार पाडावी लागते. उच्च प्रशिक्षित व्यावसायिक जे विविध प्रकारचे विमान उडवण्याचे सखोल प्रशिक्षण घेतात त्यांना पायलट म्हणून ओळखले जाते. वेग वेगळ्या प्रकारच्या विमानांसाठी वेग वेगळे स्पेशलायझेशन कोर्स उपलब्ध आहेत.
प्रवासी विमाने, मालवाहू विमाने आणि मेल विमाने अशा विविध प्रकारची विमाने चालवायला शिकण्या पासून ते विमाना ची अंतर्गत यंत्रणा सांभाळण्या ची जबाबदारी वैमानिका वर असते. जे वैमानिक खासगी विमान कंपन्या आणि वाहतूक ग्राहकां द्वारे व्यावसायिक विमाने उडवतात त्यांना एअरलाइन ट्रान्सपोर्ट पायलट म्हणतात.
गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहता, भारतात व्यावसायिक पायलट परवान्यांच्या संख्येत किरकोळ वाढ झाली आहे. 2019 मध्ये, भारतीय उड्डाण प्रशिक्षण संस्थांकडून 430 व्यावसायिक परवाने जारी करण्यात आले, तर 2021 मध्ये अशा मंजूर परवान्यांची संख्या 504 झाली. आकासा एअर आणि जेट एअरवेजच्या लॉन्चिंगमुळे वैमानिकांची मागणी वाढणार असल्याने हा आकडा अजूनही खूपच कमी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
भारतातील एअरलाइन्स सध्या परदेशातून व्यावसायिक वैमानिकांची नियुक्ती करून कमतरता हाताळत आहेत. तथापि, परदेशी वैमानिकांना दीर्घकालीन परवाने दिले जात नाहीत आणि त्यांना दरवर्षी DGCA कडून परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. भारतात वैमानिकांच्या कमतरतेचे एक कारण म्हणजे प्रशिक्षणाचा जास्त खर्च आणि प्रशिक्षण संस्थांचा अभाव. भारतात व्यावसायिक पायलटला प्रशिक्षण देण्यासाठी सुमारे 60 ते 75 लाख रुपये खर्च येतो. ही किंमत प्रशिक्षणाचे तास आणि प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणार्या विमानाच्या प्रकारावर अवलंबून असते.
Tremendous Pilot Shortage in India Challenge ahead Airline companies