पुणे – देशातील काही राज्यांमध्ये सध्या कोरोना प्रकरणात घट झाल्यामुळे तसेच लॉकडाउन आणि इतर निर्बंध कमी केल्यावर बहुतेक लोक सुट्टीच्या दिवशी सहलीवर किंवा पर्यटनाला जाण्याचा विचार करीत आहेत. परंतु कोरोनाच्या काळात बाहेरगावी फिरायला जाण्यापूर्वी सुरक्षेसंदर्भात तयारी करायला हवी. यात ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचाही समावेश असावा,असा सल्ला विमा तज्ज्ञ देत आहेत.
ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी ही केवळ प्रवाशांचे सामान, पासपोर्ट, तिकिट किंवा कागदपत्र गमावल्यास झालेल्या नुकसानीची भरपाई करत नाही तर उड्डाण रद्द झाल्यास नुकसान भरपाई देखील पुरवते. यामध्ये, प्रवासादरम्यान आपल्याला वैद्यकीय आपत्कालीन उपचार आणि रुग्णालयात दाखल करण्याची सुविधा देखील मिळते. ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत क्लेम सेटलमेंटला १५ दिवस लागतात.
मेडिकल आणि हॉस्पिटलायझेशन खर्च असलेला विमा फायद्याचा ठरतो. कारण पॉलिसीधारकास प्रवासादरम्यान कोणताही आजार किंवा दुखापत झाली असेल तर, उपचार विम्याच्या अंतर्गत तिच्या उपचारांचा आणि रुग्णालयात दाखल करण्याचा खर्च विमा कंपनीमार्फत उचलला जात आहे. यात अॅम्ब्युलन्स आणि फिजीशियन शुल्काचाही समावेश आहे. तथापि, हे सर्व पॉलिसीच्या प्रकारावर अवलंबून असते. प्रवासादरम्यान आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल होण्यासाठी रोज भत्ता देखील उपलब्ध आहे.
एखाद्या नागरिकास परदेशात जायचे असेल तर प्रवासी विमा खरेदी करताना हे लक्षात घ्यावे की त्या देशातील वैद्यकीय उपचारासाठी किती खर्च येतो. तसेच, मौल्यवान वस्तूंच्या किंमतीची गणना करणे सुनिश्चित करावे, असा सल्ला विमा व गुंतवणूक सल्लागार बळवंत जैन यांनी दिला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्या व्यक्तीला नियुक्त केलेल्या जागेवर रहाणे शक्य नसेल तर दुसर्या जागी राहण्याच्या जास्तीच्या खर्चासाठी त्याला ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये देखील समाविष्ट केले जाते. आपल्या ट्रॅव्हल इन्शुरन्स डॉक्युमेंटमध्ये सुट्टीवर जाण्यापूर्वी त्यामध्ये काय समाविष्ट आहे ते तपासणे आवश्यक आहे.
कोरोना साथ रोगाच्या काळात सध्या सर्व देशभर किंवा परदेशा दरम्यानची उड्डाण रद्द करणे आता सामान्य झाले आहे. यामुळे शेवटच्या क्षणी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या व्यतिरिक्त, जर आपली यात्रा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कोणत्याही कारणामुळे रद्द केली गेली असेल तर, कंपनी ट्रॅव्हल विम्यात भरपाई देते. याशिवाय प्रवासादरम्यान अपघाती इजा किंवा मृत्यू झाल्यास कव्हरेज देखील उपलब्ध आहे.