नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगाबाद – नाशिक महामार्गावर पंधरा दिवसापूर्वी ट्रव्हल्स बस जळीत दुर्घटनेतील ५० वर्षीय जखमी प्रवाशाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला होता. आता ही संख्या १३ झाली आहे. साहेबराव जाधव (वय ५० रा. वाशीम) असे उपचारादरम्यान दुदैर्वी मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. जाधव यांच्यावर आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी मध्यरात्री या प्रवाशाची उपचारांशी शर्थ अपयशी ठरल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. आडगाव पोलिसांत याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ८ सप्टेंबर रोजी पहाटे औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील कैलासनगरातील सिग्नलवर ही घटना घडली होती. कोळश्याचा ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्समध्ये हा भीषण अपघात झाला होता. या अपघातात बसला आग लागल्याने १२ प्रवाश्यांना आपले प्राण गमवावा लागले तर ४३ प्रवाशी जखमी झाले होते. जखमींना जिल्हारूग्णालयासह आडगाव मेडिकल कॉलेज आणि खासगी रूग्णालयात दाखल केले होते. त्यातील चौघांचे हातपाय फ्रॅक्चर होते तर काही किरकोळ जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले होते.