नाशिक – पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूकदार अडचणीत आलेला असतांना केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील करकपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल ५ तर डिझेल जवळपास १२ रुपयांनी स्वस्त झाले आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असून केंद्राच्या निर्णयाप्रमाणे राज्यानेही पेट्रोल डिझेल वरील करकपात करावा अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करत असल्याचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या पेट्रोल डिझेल करकपातीच्या निर्णयाचे स्वागत करतांना अध्यक्ष राजेंद्र फड यांनी म्हटले आहे की, पेट्रोल डिझेलचे दर अधिक वाढल्याने सर्वाधिक फटका हा ट्रान्सपोर्ट क्षेत्राला बसला आहे. अगोदरच टोल, रस्त्यावरील असुविधा यासह अनेक प्रश्नाचा सामना करत असलेल्या ट्रान्सपोर्ट क्षेत्राचे पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे कंबरडे मोडले होते. याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आम्ही वेळोवेळी केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. प्रसंगी आम्ही आंदोलनाच्या तयारीत होतो. याबाबत सरकारला इशारा सुद्धा आम्ही दिलेला होता.
आमच्या सततच्या मागणीचा केंद्र सरकारने विचार करून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेलवरील करकपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल पाच तर डिझेल १२ रुपयांनी स्वस्त झाले आहे. याचा सर्वाधिक फायदा ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना मिळाला असून काही अंशी दिलासा मिळाला आहे. या निर्णयाप्रमाणे राज्य सरकारने देखील पेट्रोल डिझेल वरील राज्य सरकारचे कर कमी केले तर पेट्रोल डिझेलचे दर कमी होऊन ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांसोबत सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी म्हटले आहे.