नाशिक – आडगाव ट्रक टर्मिनल येथील गाळे धारकांना आकारण्यात आलेल्या घरपट्टीतील दुरुस्तीसह विविध प्रश्नांबाबत आज नाशिक नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेतली. यावेळी आमदार सीमा हिरे, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, सुभाष जांगडा, गुरुमेलसिंग इप्पल महेंद्रसिंग राजपूत, दिपक ढिकले, शंकर धनावडे, विनोदकुमार चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नाशिक शहरातील ट्राफिकचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नाशिक शहराच्या चारही भागात यामध्ये आडगाव ट्रक टर्मिनल विकसित करण्यासोबतच अंबड, चेहडी व सिन्नर फाटा येथे ट्रक टर्मिनल विकसित करण्यात यावे. तसेच याठिकाणी अधिक गाळ्यांची निर्मिती करण्यात यावी येथील गाळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक घेतील त्यातून मनपालाही अधिक उत्पन्न मिळेल. तसेच ट्रक टर्मिनल शहराच्या बाहेर राहिल्यास अपघातांचे प्रमाण देखील कमी होईल अशी मागणी अध्यक्ष राजेंद्र फड यांनी केली. तसेच आडगाव ट्रक टर्मिनल येथे आकारण्यात आलेल्या घरपट्टीमध्ये दुरुस्त्या करण्यात येऊन याठिकाणी आवश्यक सुविधा करण्यात याव्या अशी मागणी यावेळी केली.
आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व कार्याध्यक्ष पी.एम.सैनी यांनी नाशिक महापालिकेचे महापौर सतीश कुलकर्ण यांनाही निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील आडगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनल आहे. या टर्मिनलमध्ये नाशिक महानगरपालिकेचे गाळे असून ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांना हे गाळे भाडे तत्वावर देण्यात आलेले आहे. या ठिकाणी कुठल्याही आवश्यक सुविधा नसतांना देखील हे गाळेधारक नियमितपणे गाळेभाडे भरतात. येथील गाळेधारकांना उद्भवत असलेल्या समस्या बाबत संघटनेच्या वतीने निवेदने देऊन देखील अद्याप सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही. या परिस्थितीत येथील गाळेधारक येथे काम करत असल्याचे म्हटले आहे.
एकीकडे अनेक अडचणींचा सामना करत असतांना आता नाशिक महानगरपालिकेच्या वतीने २०१२ पासून घरपट्टी देण्यात आलेली आहे. त्यामुळे गाळेधारक अधिक अडचणीत आले आहे. एकीकडे कोरोनाच्या कालावधीत वाहतूक व्यवसायाचे कंबरडे मोडले असतांना त्यातून सावरणाऱ्या या उद्योगाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाशिक मनपा कडून आकारण्यात आलेल्या या घरपट्टीमुळे वाहतूकदार संघटना व गाळेधारकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. नाशिक मनपा जर घरपट्टी आकारणार असेल तर त्यांनी याठिकाणी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. घरपट्टी आकारताना ज्या वेळी गाळा धारकाने गाळा घेतला आहे. तेव्हापासून त्याला पट्टी लावण्यात यावी. मात्र अनेकांना चुकीच्या पद्धतीने घरपट्टी लावण्यात आलेल्या आहेत. त्यात दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली.
तसेच ट्रक टर्मिनल मधील रस्ते, पावसाळी गटार, ड्रेनेज लाईन, सुरक्षा भिंत, मोबाईल टॉवर समस्या वारंवार पहापलिकेचे आयुक्त व आधिकाऱ्यांच्या, महापौरांच्या आणि पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. या सर्व गैरसोई असून सुद्धा आम्ही भाडे मात्र भरत आहे. उर्वरित गाळे आमचे काही व्यावसायिक घेण्यास तयार असून याबाबत उचित कार्यवाही करण्यात येऊन नाशिक शहराच्या चारही भागात ट्रक टर्मिनल विकसित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.