विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे म्हटले जात असून त्याकरिता शास्त्रज्ञ नवनवीन संशोधन करित आहेत. तसेच नवीन उपकरणेही तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे लहान मुले कोरोनाविरुद्ध लढू शकतील. याचाच एक भाग म्हणजे केंद्रीय वैज्ञानिक उपकरणे संस्थेने (सीएसआयओ) पारदर्शक मास्कचा दुसरा नमुना तयार केला आहे. या माध्यमातून मुले अधिक सुरक्षित राहू शकतील.
शास्त्रज्ञांच्या पथकाने शालेय मुलांवर चाचणी केली असून विशेष म्हणजे ही चाचणी बोलू शकत नाही (दिव्यांग) अशा मुलांवर केली गेली. फक्त हावभाव करून बोलणाऱ्या मुलांसाठी हा मास्क बाजारात आणण्याची तयारी सुरू आहे, तो या महिन्याच्या म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात येऊ शकेल.
सीएसआयओच्या युवा शास्त्रज्ञ डॉ. सुनीता मेहता यांनी मास्क डिझाइन केला असून तो पारदर्शक आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे विषाणू त्यामध्ये प्रवेश करू शकत नव्हता. त्यानंतर येथील शास्त्रज्ञांनी पारदर्शक मास्कची सुधारित श्रेणी तयार केली. लायन क्लब डेफ अँड डंब स्कूलच्या विद्यार्थ्यांवर याचा प्रयोग मुलांवर करण्यात आला. म्हणजे त्यांना मास्क लावल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ नये.
अनेक मुलांवर केलेले प्रयोग यशस्वी झाले असून वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की, कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी हा मास्क संपूर्ण देशात पोहोचेल. या मास्कचे वैशिष्ट्ये म्हणजे तो पारदर्शक असून त्यातून प्रत्येकाचा चेहरा दिसू शकतो. तो संपूर्ण चेहरा कव्हर करतो. तसेच व्हायरस त्यात प्रवेश करू शकत नाही. तसेच सहजपणे २० ते २५ वेळा वापरले जाऊ शकतो आणि साबणाने धुतला जाऊ शकतो.