नाशिक – तृतीयंपथीयांचे कल्याण व हक्कांचे संरक्षण अंतर्गत नाशिक विभागातील पाच ही जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी ओळखपत्र मिळविण्यासाठी ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या वेबसाईटला भेट देवून अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाचे सदस्य सचिव तथा नाशिक समाज कल्याण विभागचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर यांनी केले आहे.
तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम 2019 मधील नियम 2020 अंतर्गत विभाग 6 व 7 नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र अदा करण्याची तजविज आहे. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, मंत्रालय, भारत सरकार, यांच्यामार्फत राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन (National Portal For Transgender Persons) या वेबसाईटवर किंवा https://transgender.dosje.gov.in/Applicant/Login/Index या लिंक वर भेट देऊन अप्लाय ऑनलाईन (Apply Online) यावर आपला युजर आयडी व पासवर्ड तयार करुन आपली सर्व माहिती भरावी.
ऑनलाईन अर्जासोबत आयकार्ड साईज फोटो, स्कॅन केलेली सही, आपण तृतीयपंथीय असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, शासकीय रुग्णालयातील मानसोपचारतज्ञ यांनी दिलेला अहवाल व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत संलग्न करावीत, असेही भगवान वीर यांनी सांगितले आहे.