त्र्यंबकेश्वर – देशविदेशातील कोटयावधी वारकरी भाविकांचे श्रध्दास्थान,वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संत ज्ञानोबा माऊलींचे गुरू व थोरले बंधु संत निवृत्तीनाथ महाराजांनी जेथे संजीवन समाधी घेतली त्या देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची निवड प्रदिर्घ कालावधी पासून प्रलंबीत राहीली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन असतांना २० मे २०२० रोजी विश्वस्त मंडळाची मुदत संपुष्टात आली. मात्र कोविड महामारीच्या कारणास्तव नव्याने जाहीरत निघाली नाही. त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये विश्वस्तपदासाठी धर्मदाय उपायुक्त नाशिक यांनी अर्ज मागविले. त्यावेळेस १८७ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या मुलाखती देखील जानेवारी २०२१ च्या पहिल्या आठवडयात घेण्ंयात आल्या. मात्र त्या मुलखतींचा निर्णय झालाच नाही. दरम्यान १ फेबुवारी २०२१ रोजी धर्मदाय सहआयुक्त जयसींग झपाटे यांनी नव्याने प्रकटन जाहीर केले व पुन्हा विश्वस्त पदासाठी अर्ज मागविले. आगोदर झालेल्या मुलखतींचे काय झाले.त्या रद्द झाल्या की काय याबाबत काहीही समजले नाही. दरम्यान कार्यरत असलेले विश्वस्त मंडळ बरखास्त केले आणि तेथे प्रशासकांची नेमणुक केली. दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ रोजी असलेली संत निवृत्तीनाथांची यात्रा प्रशासकांच्या देखरेखी खाली झाली.विश्वस्तपदासाठी पुन्हा नव्याने १८५ व्यक्तींनी अर्ज दाखल केले. त्यानंतर १ मार्च २०२१ रोजी धर्मदाय सहआयुक्त कार्यालयात विश्वस्तांच्या मुलखतींसाठी बोलावण्यात आले. मात्र कोविड दुस-या लाटेची सुरूवात झाल्याचे लक्षात आल्याने मुलाखतींचा नियोजीत कार्यक्रम तहकुब करण्यात आला.तो आज तगायत तहकुबच राहीला आहे. वास्तवीक पाहता त्यानंतर काही महिन्यांनी वातावरण निवळले तसे न्यायालयीन कामकाज सुरू झाले. संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टच्या नंतर प्रक्रिया सुरू झालेल्या देवस्थानांचे विश्वस्त मंडळांच्या नियुक्त्या झाल्या मात्र संत निवृत्तीनाथ ट्रस्टच्या बाबत कोणताही निर्णय झाला नाही.
दरम्यान २६ ऑक्टोंबर २०२१ रोजी वारकरी महामंडळाने धर्मदाय सहआयुक्त यांना विनंती अर्ज सादर केला आणि संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचा जिर्णोध्दार आणि परिसर विकास आराखडा राबविणे या करिता विश्वस्तांची नेमणुक तातडीने दाखल करण्याची मागणी केली. त्याच वेळेस खासदार हेमंत गोडसे यांनी देखील दूरध्वनीवरून र्ध्मदाय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांना त्यावेळेस येत्या दोनचार दिवसात कार्यक्रम लागेल असे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यानंतर काहीही हालचाल झालेली नाही.
२८ जानेवारी २०२२ रोजी संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने शासनाने यावर्षी देखील यात्रोत्सव रद्द केल आहे. मात्र वारकरी भाविक आजही संभ्रमावस्थेत आहेत. यात्रा रद्द झाली असेल परंतु शेकडो वर्षांपासून येणा-या वारक-यांच्या भावनेचा हा प्रश्न आहे. विश्वस्त मंडळ अस्तित्वात असते तर आज ही वेळ आली नसती. यात्रा रद्द झाली मात्र प्रत्येक दिंडीतील निवडक वारक-यांना विणा ध्वजा देवता घेऊन नाथांच्या समाधीचे दर्शन घडले असते. याबाबत कोणताही ठोस कार्यक्रम अद्याप पर्यंत शासन आणि प्रशासक यांनी जाहीर केलेला नाही. मंदिराचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. परिसर विकास आराखडा काम मार्गी लावण्यासाठी विश्वस्त मंडळाची गरज भासते आहे.
विश्वस्त मंडळ हवे
संत निवृत्तीनथ संजीवन समाधी मंदिर ट्रस्ट सदस्यांची निवड प्रकिया कोरोनाचे नियम पाळुन घेण्यास हरकत नाही. विश्वस्त मंडळ नेमणुक नसल्याने मंदिर परिसर विकास खोळंबला आहे .तसेच यात्राजत्रा कालावधीत नियोजनासाठी विश्वस्त मंडळ अस्तित्वात येणे आवश्यक आहे.
ह.भ.प.श्रावण महाराज आहिरे, जिल्हाध्यक्ष, वारकरी महामंडळ महाराष्ट्रराज्य