त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खंडग्रास सुर्यग्रहण पर्वकाळाचे पुण्य पदरी पाडून घेण्यासाठी आज श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे हजारो भाविकांनी हजेरी लावली. हिंदु धर्मशास्त्रीय मान्यतेनुसार ग्रहण पर्वकाळात पुजा पाठ, जप, पोथी वाचन अशा धार्मिक कृत्यांना विशेष महत्व आहे. त्यामुळे ग्रहण पर्व काळ सुरू झाल्यापासून अनेक भाविक कुशावर्तामध्ये उभे राहुन तर काही भाविक कुशावर्ताच्या ओव-यांमध्ये बसुन जपजाप्य अनुष्ठाण करीत होते .
भगवान त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. काही भाविक मंदिराच्या सभामंडपात ध्यानधारणा करीत होते तर बऱ्याच भाविकांनी ग्रहण काळात मंदिराला प्रदक्षिणा घातल्या यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. ग्रहण पर्वकाळामध्ये विश्वशांतीसाठी भगवान त्र्यंबकेश्वराची विशेष महापुजा केली जाते. त्यानुसार ग्रहणाच्या प्रारंभापासून महापुजा सुरू करण्यात आली. भगवान त्र्यंबकेश्वराचे वंशपरंपरागत पुजारी डॅा. सत्यप्रिय शुक्ल यांनी पुजा केली.
भगवान त्र्यंबकेश्वरास अभिषेक झाल्यावर पिंडीवर सप्तधान्य पुजा मांडण्यात आली. देवावर नवीन वस्त्र परिधान करण्यात आले. या दरम्यान मंदिराच्या प्रांगणात पालखी सोहळा संपन्न झाला. देवस्थान ट्रस्ट कार्यालया मधुन भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सोन्याचा व एक चांदीचा मुखवटा पालखीत विराजमान करून प्रांगणातुन वाजत गाजत मंदिरात आणण्यात आला. देवांना नवीन पोषाख करून ब्रह्मा विष्णु आणि महेश यांचे प्रतिकात्मक म्हणुन एक सोन्याचा व दोन चांदीचे असे तीन मुखवटे पिंडीवर ठेवण्यात आले. देवांना महानैवेद्य अर्पण करून महाआरती करण्यात आली. यावेळी संस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी, तुंगार परिवार यांचेसह देवस्थानचे पदाधिकारी समीर वैद्य, अमित टोकेकर, रशवी जाधव, विजय गंगापुत्र आदि ऊपस्थित होते.
ग्रहण पर्वकाळ संपल्यावर भाविकांनी कुशावर्त तिर्थामध्ये स्नानासाठी व नंतर भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. निलपर्वतावरील जुना आखाड्याचे संरक्षक महामंत्री हरिगिरीजी महाराज आणी साधुसंत व भाविकांनी बिल्वतिर्थामध्ये स्नान केले.